मुंबई Yuvraj Singh 6 Sixes : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक खेळाडू बघितले आहेत. पण आजवर युवराज सिंगसारखा स्टार झालेला नाही. युवराज हा एक असा खेळाडू होता जो बॅट आणि बॉल दोन्हीच्या जोरावर सामना फिरवत होता. भारताला 2007 T20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली. युवराजच्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय गोष्टींचा समावेश आहे. पण जेव्हा T20 इंटरनॅशनलचा विचार केला जातो, तेव्हा चाहत्यांना त्यानं एका षटकात मारलेले सलग सहा षटकार आठवतात. आज या ऐतिहासिक क्षणाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. युवीनं 2007 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडला षटकात इतिहास रचला होता.
अँड्र्यू फ्लिंटॉफशी झालं होतं भांडण : वास्तविक, T20 विश्वचषक स्पर्धेच्या 21 व्या सामन्यात 19 सप्टेंबर रोजी भारताचा सामना इंग्लंडशी झाला. यात भारतीय कर्णधार एमएस धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 17 व्या षटकात 155 धावांवर तिसरी विकेट गमावली आणि त्यानंतर युवराज सिंग पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरला. इंग्लिश अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफनं सुरुवातीपासूनच युवीशी वाद घातला आणि यानंतर डावखुऱ्या फलंदाजाची वेगळी बाजू पाहायला मिळाली आणि त्यानंतर त्यानं ऐतिहासिक कामगिरी केली.
स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात रचला इतिहास : फ्लिंटॉफशी झालेल्या वादानंतर युवराज सिंगनं डावातील 19 वं षटक टाकण्यासाठी आलेल्या युवा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला लक्ष्य केलं. युवराजनं ब्रॉडच्या षटकात एकापाठोपाठ एक सहा षटकार ठोकले आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानं या सामन्यात अवघ्या 12 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले, जे त्यावेळी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही होता. युवीनं 16 चेंडूत 3 चौकार आणि सात षटकारांसह 58 धावांची खेळी केली होती.