कोल्हापूर Swapnil Kusale :72 वर्षांचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपवून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे पदक जिंकल्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हापुरात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ऑलम्पिकवीर स्वप्नीलचं ताराराणी चौकातून सजवलेल्या जीपमधून कोल्हापुरातील जनतेनं भव्य स्वागत केलं. ताराराणी चौक आणि दसरा चौकात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून त्याचं स्वागत करण्यात आलं. कोल्हापूरकरांनी केलेल्या स्वागतानं संपूर्ण कुसळे परिवार भारावून गेला.
स्वप्नीलचं जल्लोषात स्वागत : राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथे राहणाऱ्या स्वप्नीलनं ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्नीलचं जंगी स्वागत केलं जाईल, असे सांगितले होतं. पदक घेऊन आलेल्या स्वप्नीलचं आज जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरातील ताराराणी चौकातून करवीर संस्थापक छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी खुल्या जीपमधून स्वप्नीलसह त्याची आई, वडील आणि प्रशिक्षक यांच्यावरही पुष्पवृष्टी करण्यात आली. तर दुसऱ्या जीपमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील उपस्थित होते.
शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण :पारंपारिक वेशभूषेत आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीत सहभागी झालेल्या कोल्हापुरातील नागरिकांनी भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मिरवणूक मध्यवर्ती बसस्थानक परिसर, व्हीनस कॉर्नर मार्गे ऐतिहासिक दसरा चौकात आल्यानंतर स्वप्नीलच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.