मेलबर्न Novak Djokovic Retires : ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. 10 वेळा चॅम्पियन राहिलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच उपांत्य फेरीचा सामना अर्ध्यावरच सोडून मैदानाबाहेर गेला. खरंतर, तो दुखापतीनं त्रस्त आहे आणि पहिला सेट गमावल्यानंतर, तो पुढं जाण्यासाठी स्वतःला तंदुरुस्त वाटला नाही आणि निघून गेला. ही घटना आश्चर्यकारक आहे कारण जोकोविचला स्पर्धा जिंकण्यासाठी फेव्हरिट मानलं जात होतं. त्याच्या माघारीमुळं जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला अंतिम फेरीत पोहोचता आलं.
जोकोविच दुखापतीनं त्रस्त : 37 वर्षीय जोकोविचची दुखापत गंभीर असल्याचं मानलं जात आहे आणि मेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेना इथं झ्वेरेव्हविरुद्धच्या पहिल्या सेटमध्ये तो संघर्ष करताना दिसला. त्यानं अनेक चुकाही केल्या. टायब्रेकरमध्ये झ्वेरेव्हनं पहिला सेट 7-6 असा जिंकण्यात यश मिळवलं. यानंतर लगेचच, जोकोविचनं बॅग उचलली आणि पंचांना कळवलं की तो सामना पुढं चालू ठेवू शकत नाही. या स्पर्धेत जोकोविचचा आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. त्यानं क्वार्टर फायनलमध्ये स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराजचा 4-6, 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला होता.
जोकोविचचा प्रवास : जोकोविचनं पहिल्या फेरीत निशीश बसवरेड्डीचा 4-6, 6-3, 6-4, 6-2 असा पराभव केला. यानंतर, दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्यानं जे फारियाचा 6-1, 7-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत जोकोविचनं माचॅकचा 6-1, 6-4, 6-4 असा पराभव केला. त्यानंतर चौथ्या फेरीत त्यानं लेचकाचा 6-3, 6-4, 7-6 असा पराभव केला. क्वार्टर फायनलमध्ये तो अल्काराझसाठी खूपच मजबूत असल्याचं सिद्ध झाले. जोकोविचला या स्पर्धेत सातवं मानांकन देण्यात आलं.