पुणे New Zealand Won 1st Test Series on Indian Soil : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यामुळं ही कसोटी मालिकाही भारतानं गमावली. न्यूझीलंडनं मालिकेत इतिहास रचला आणि 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. त्याचवेळी, न्यूझीलंडनं भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच भारतीय संघाची भारतात सलग कसोटी मालिका जिंकण्याची मालिकाही खंडित झाली आहे.
12 वर्षांनंतर कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर पराभव : हा पराभव भारतासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. वास्तविक, भारतानं 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यापूर्वी 2012-13 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडनं भारतीय संघाचा कसोटी मालिकेत पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय संघाचं घरच्या मैदानावर वर्चस्व होतं. त्यांनी सलग 18 मालिका जिंकल्या होत्या, मात्र आता ही विजयी मालिका थांबली आहे. त्याचवेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं घरच्या मैदानावर चौथा कसोटी सामना गमावला आहे. भारतात सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा तो आता संयुक्तपणे दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे.
69 वर्षांनी पहिला मालिका विजय : न्यूझीलंड संघ 1955 पासून भारत दौऱ्यावर येत आहे. परंतु त्यांनी भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र आता काळ बदलला आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या युवा संघानं 69 वर्षांचा दुष्काळ संपवून इतिहास रचला आहे. 69 वर्षांनंतर पहिल्यांदाच कीवी संघानं भारतातच कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडनं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.