हॅमिल्टन NZ vs ENG 3rd Test Live Streaming :न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर (शनिवार) पासून हॅमिल्टन येथील सेडन पार्क इथं खेळवला जाणार आहे.
इंग्लंडनं जिंकली मालिका : बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघानं या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. मात्र, यजमान संघ आता आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि मायदेशातील मालिकेत क्लीन स्वीप टाळण्यास उत्सुक असेल. पहिला कसोटी सामना इंग्लंडनं 8 विकेटनं जिंकली. तर दुसऱ्या सामन्यात, हॅरी ब्रूक आणि जो रुट या दोघांनी शानदार शतकं झळकावल्यामुळं न्यूझीलंडच्या घरच्या प्रेक्षकांसमोर पुनरागमन करण्याच्या आशा धुळीस मिळाल्या.
सामन्याआधीच जाहीर केली प्लेइंग 11 :इंग्लंडनं या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली असून तिसरी कसोटी त्यांच्यासाठी विजयासह मालिका संपवण्याची आणखी एक संधी आहे. या सामन्यासाठी इंग्लंडनं आपल्या संघात फारसे बदल केलेले नाहीत आणि संघाचं लक्ष वेगवान गोलंदाजीसह संतुलित कामगिरीवर आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये ख्रिस वोक्सनं गोलंदाजीत आणि फलंदाजीनं योगदान दिले होते, मात्र तिसऱ्या कसोटीत त्याच्या जागी मॅथ्यू पॉट्सचा समावेश करण्यात आला आहे. पॉट्सला नवीन खेळाडू म्हणून आणण्यात आलं आहे जेणेकरुन संघाला वेगवान गोलंदाजीमध्ये अधिक पर्याय मिळू शकतील. संघाचा कर्णधार बेन स्टोक्सनं हा बदल संघाच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे.
68 वर्षांनंतर किवी संघावर नामुष्कीची शक्यता : न्यूझीलंड संघानं यंदाच्या घरच्या कसोटी मालिकेत अत्यंत खराब कामगिरी केली आहे. दरम्यान, त्यांचा संघ एक लाजिरवाणा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यांच्या संघानं या वर्षात घरच्या मैदानावर सलग चार कसोटी सामने गमावले आहेत. किवीज त्यांच्या घरच्या मैदानावरील त्यांच्या सर्वात खराब विक्रमाची बरोबरी करण्याच्या मार्गावर आहे. 1955 ते 1956 दरम्यान त्यांनी न्यूझीलंडमध्ये सलग पाच कसोटी सामने गमावले. 68 वर्षांनंतर, टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ या नकोशा विक्रमाची बरोबरी करण्याच्या अगदी जवळ आहे आणि त्यांनी इंग्लंडविरुद्धचे दोन सामने ज्याप्रकारे गमावले आहेत ते पाहता त्यांना मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना गमवावा लागेल असं दिसतं.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 114 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये इंग्लंडनं 114 पैकी 54 कसोटी सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडनं केवळ 13 सामने जिंकले आहेत. याशिवाय 47 सामने अनिर्णित राहिले आहेत. आकडेवारी पाहिल्यास इंग्लंडचा वरचष्मा दिसतो.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतीचा इतिहास कसा : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 40 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं 40 पैकी 24 मालिका जिंकल्या आहेत. तर कीवी संघानं 6 कसोटी मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय 10 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, (इंग्लंड 8 विकेटनं विजयी)
- दुसरा कसोटी सामना : 6-10 डिसेंबर, (इंग्लंड 323 धावांनी विजयी)
- तिसरा कसोटी सामना: 14-18 डिसेंबर, सेडन पार्क, हॅमिल्टन