हैदराबाद ED Summons Former Cricketer : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले आहेत. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. अझरुद्दीनला आज ईडीसमोर हजर व्हावं लागणार आहे.
ईडीची 9 ठिकाणी छापेमारी : अझरुद्दीनची सप्टेंबर 2019 मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) ची अध्यक्ष म्हणून निवड झाली. जून 2021 मध्ये त्यांना आपलं पद सोडावं लागलं होतं. निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ईडीनं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीनं तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत.
ईडीनं नोंदवले एफआयआर : स्टेडियम बांधकामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या म्हणण्यानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामात आर्थिक अनियमितता केली होती. त्यांनी खासगी कंपन्यांना चढ्या दरानं कंत्राटं देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलं. या प्रकरणी ईडीनं तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरु आहे.