बंगळुरू Mayank Agarwal Health : कर्नाटकचा कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर मयंक अग्रवाल याला विमानात अचानक तब्बेत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तो पूर्णपणे बरा झाला असून तो शुक्रवारपासून चेन्नई इथं तामिळनाडू विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात कर्नाटकचं नेतृत्व करेल.
विमानात बसताच त्रास सुरू झाला : 30 जानेवारीला त्रिपुराविरुद्धच्या सामन्यानंतर सूरतला जात असताना मयंक अग्रवालच्या तोंडात आणि घशात जळजळ सुरू झाली होती. त्यानंतर या 32 वर्षीय फलंदाजाला आगरतळातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विमानात बसताच कुठलंतरी पेय पील्यानंतर त्याला हा त्रास सुरू झाला होता. या प्रकरणी त्यानं एफआयआरही दाखल केला होता.
निकिन जोसनं नेतृत्व केलं : प्रकृती अस्वास्थ्यामुळे मयंक रेल्वेविरुद्ध कर्नाटकच्या शेवटच्या रणजी सामन्यात खेळू शकला नाही. आता वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा संघात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्रवालच्या अनुपस्थितीत, निकिन जोसनं रेल्वेविरुद्ध कर्नाटकचं नेतृत्व केलं. अनुभवी मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कर्नाटकनं एक विकेटने विजय नोंदवला.