मेलबर्न Matthew Wade Announced Retirement : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी स्फोटक फलंदाज मॅथ्यू वेडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 8 महिन्यांतील वेडची ही दुसरी निवृत्ती आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, त्यानं शेफिल्ड शील्डची अंतिम फेरी खेळल्यानंतर प्रथम श्रेणी म्हणजेच लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मॅथ्यू वेडनं या वर्षी जूनमध्ये भारताविरुद्धच्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
विश्वचषकात महत्त्वाची भूमिका :ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं फक्त एकदाच T20 विश्वचषक जिंकला आहे आणि तोही 2021 साली. त्यात मॅथ्यू वेडनं ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळलं आणि संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकवून दिले आहेत.
T20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत उत्कृष्ट खेळी : मॅथ्यू वेडनं 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून त्यानं संघासाठी 92 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 1202 धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 2021 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळलेली वेडची खेळी नेहमी लक्षात राहिल. त्यात त्यानं ऑस्ट्रेलियाला हरवलेला सामना जिंकून दिला. वेडनं सामन्याच्या 19 व्या षटकात शाहीन आफ्रिदीला लागोपाठ तीन षटकार ठोकले आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या दिशेनं वळवला. त्या सामन्यात त्यानं अवघ्या 17 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांसह 41 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी : मॅथ्यू वेडनं निवृत्तीची घोषणा केली असली, तरी तो टास्मानिया आणि होबार्ट हरिकेन्स तसंच काही परदेशी लीगसाठी व्हाईट-बॉल क्रिकेट खेळत राहील. याशिवाय निवृत्तीनंतर त्यानं कोचिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी पाकिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी त्याला यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
मॅथ्यू वेडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द : मॅथ्यू वेडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ऑक्टोबर 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 सामन्यानं सुरुवात झाली. तेव्हापासून जून 2024 पर्यंत, त्यानं 92 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 1202 धावा केल्या. याशिवाय त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 97 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्यानं 1867 धावा केल्या. फेब्रुवारी 2012 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पहिला वनडे खेळणाऱ्या वेडनं जुलै 2021 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्याची कसोटी कारकीर्द एप्रिल 2012 मध्ये सुरु झाली आणि त्यानं जानेवारी 2021 मध्ये भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. ऑस्ट्रेलियासाठी 36 कसोटी खेळलेल्या या यष्टीरक्षक फलंदाजानं मार्च 2024 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यानं एकूण 225 सामने खेळले आहेत.
मॅथ्यू वेडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळत राहील. म्हणजेच मॅथ्यू वेडची फलंदाजी आयपीएल 2025 मध्ये नक्कीच पाहायला मिळू शकते.
हेही वाचा :
- दक्षिण आफ्रिका आशिया खंडात 10 वर्षांत दुसरा सामना जिंकणार? निर्णायक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
- भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना स्टेडियममध्ये पाहायचा? मोबाईल रिचार्जपेक्षाही स्वस्त मिळतंय मॅचचं तिकिट, 'असं' करा खरेदी