हॅमिल्टन Martin Guptill on Retirement : नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज मार्टिन गुप्टिलनं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डावर नाराजी व्यक्त केलीय. न्यूझीलंड क्रिकेटला मला अजूनही खूप काही द्यायचं होतं. ज्या पद्धतीनं मला निवृत्ती घ्यावी लागली त्यामुळं मी निराश झाल्याचं त्यानं सांगितलं आहे.
काय म्हणाला गुप्टिल :निवृत्ती घेतल्यानंतर द न्यूझीलंड हेराल्डला गुप्टिलनं सांगितलं की, "परिस्थिती पाहून मी हा निर्णय घेतला. न्यूझीलंड क्रिकेटला मला अजूनही खूप काही द्यायचं होतं. ज्या पद्धतीनं मला निवृत्ती घ्यावी लागली त्यामुळं मी निराश झालो आहे. पण मला पुढं जावं लागेल." जेव्हा हे स्पष्ट झालं की न्यूझीलंड क्रिकेटचं लक्ष नवीन खेळाडूंवर आहे, तेव्हा त्यानं जगभरातील विविध T20 लीगमध्ये खेळण्याचा आपला करार सोडला. त्याला भारतात झालेल्या 2023 च्या विश्वचषक संघात स्थान मिळालं नाही आणि निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी त्यानं दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही.
मला पश्चाताप नाही : 2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत महेंद्रसिंग धोनीला धावचीत करणारा गुप्टिल म्हणाला, "माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे जेव्हा मला ब्लॅक कॅप मिळाली. मला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली पण मला पुन्हा वरच्या क्रमांकावर जायचं होतं. मला काहीच पश्चात्ताप नाही. मी माझ्या परीनं प्रयत्न केले आणि खेळाचा पुरेपूर आनंद घेतला."
कसं राहिलं गुप्टिलचं करियर : न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या मर्यादित षटकांच्या सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक असलेल्या गुप्टिलनं 198 वनडे सामन्यांमध्ये 18 शतकं आणि 39 अर्धशतकांसह 7346 धावा केल्या आहेत. त्यानं न्यूझीलंडसाठी 122 T20 सामन्यांमध्ये 3531 धावा केल्या, ज्यात दोन शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. गुप्टिलनं शेवटचा सामना 2022 मध्ये न्यूझीलंडकडून खेळला होता.
हेही वाचा :
- वरुणची 'चक्रवर्ती' खेळी... एकट्यानं केला अर्धा संघ आउट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी
- मराठमोळा क्रिकेटपटू करणार भाजपामध्ये प्रवेश? 'त्या' एका भेटीनं रंगली चर्चा