महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लखनऊच्या 'नवाबां'समोर चैन्नईचे 'किंग्स' फेल; लखनऊनं घरच्या मैदानावर चेन्नईचा 8 विकेटनं उडवला धुव्वा - LSG vs CSK

IPL 2024 LSG vs CSK : यंदाच्या आयपीएलच्या 34व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 8 विकेट्सनं पराभव केलाय. केएल राहुलनं 82 धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

IPL 2024 LSG vs CSK
लखनऊच्या 'नवाबां'समोर चैन्नईचे 'किंग्स' फेल; लखनऊनं घरच्या मैदानावर चेन्नईचा 8 विकेटनं उडवला धुव्वा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 9:07 PM IST

Updated : Apr 20, 2024, 6:37 AM IST

लखनऊ IPL 2024 LSG vs CSK : आयपीएल 2024 च्या 34 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) नं चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा आठ गडी राखून पराभव केलाय. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात चेन्नईनं यजमान संघाला विजयासाठी 177 धावांचं लक्ष्य दिलं होतं जे त्यांनी 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. यासह लखनऊचा हा सात सामन्यांमधला चौथा विजय होता, तर दुसरीकडं चेन्नईचा सात सामन्यांमधला हा तिसरा पराभव ठरलाय.

राहुल आणि डी कॉकची शतकीय भागिदारी : लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लखनऊ संघाला कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकनं शानदार सुरुवात करुन दिली. राहुल आणि डी कॉकमध्ये 15 षटकात 135 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीनं सामना पूर्णपणे लखनऊच्या बाजूनं वळवला. राहुलनं 53 चेंडूत 9 चौकार आणि तीन षटकारांसह सर्वाधिक 82 धावा केल्या. तर डी कॉकनं 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. डी कॉकनं आपल्या खेळीत 5 चौकार आणि एक षटकार लगावला. तर निकोलस पूरन 23 आणि मार्कस स्टोइनिस 8 धावांवर नाबाद राहिले.

चेन्नईची समाधानकारक धावसंख्या :तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 6 गडी गमावून 176 धावा केल्या. सीएसकेकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक 57 धावांची नाबाद खेळी केली. जडेजानं 40 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. अजिंक्य रहाणेनं 36 धावांची तर मोईन अलीनं 30 धावांची तुफानी खेळी केली. शेवटी महेंद्रसिंग धोनीनंही 9 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. धोनीनं आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. लखनऊकडून कृणाल पांड्यानं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मोहसिन खान, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई आणि यश ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही संघाच्या अंतिम एकादशमध्ये बदल : या सामन्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सनं न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला आपल्या संघात समाविष्ट केलं. हेन्रीनं शमर जोसेफची जागा घेतली. तर दुसरीकडं चेन्नईनं आपल्या संघात काही बदल केले. त्यात डॅरिल मिशेलच्या जागी इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला संधी मिळाली. तर शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी मिळाली.

हेही वाचा :

  1. सूर्याच्या झंझावातानंतर कोएत्झी-बुमराहच्या गोलंदाजीसमोर पंजाबचे फलंदाज 'गुमराह'; पंजाबच्या घरात मुंबईचा विजयी 'भांगडा' - PBKS vs MI
  2. 16 वर्षांचं झालं आयपीएल! पहिल्याच सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमच्या दीडशतकी खेळीमुळं केकेआरनं आरसीबीवर केली होती 'दादा'गिरी - Happy Birthday IPL
Last Updated : Apr 20, 2024, 6:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details