अॅडलेड Son hits for Six Father Takes Catch : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीग 2024-25 चा 31वा सामना शनिवारी अॅडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट या संघांमध्ये खेळला गेला. हा सामन्यात एकूण 446 धावा झाल्या. त्याच वेळी, या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळं सर्वांनाच आश्चर्य वाटले. खरंतर, सामन्यात एका गोलंदाजाच्या चेंडूवर षटकार मारण्यात आला आणि त्यादरम्यान स्टँडमध्ये बसलेल्या एका व्यक्तीनं तो झेल घेतला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून या गोलंदाजाचे वडील होते.
मुलाच्या बॉलिंगवर षटकार, वडिलांनी पकडला झेल : खरंतर, हा सामना अॅडलेड स्ट्रायकर्सचा वेगवान गोलंदाज लियाम हॅस्केटचा पदार्पण सामना होता. तो त्याच्या पहिल्या सामन्यात विकेट घेण्यात यशस्वी झाला, पण तो महागडाही ठरला. या सामन्यात लियाम हॅस्केटनं 3 षटकं टाकली आणि 14.33 च्या इकॉनॉमीनं 43 धावा दिल्या. यादरम्यान त्यानं 2 विकेट्सही घेतल्या. लियाम हॅस्केटच्या स्पेल दरम्यान ब्रिस्बेनच्या फलंदाजांनी 4 षटकार मारले. यातील एक षटकार तरुण फलंदाज नॅथन मॅकस्विनीने मारला. नॅथन मॅकस्वीनीनं लियाम हॅस्केटचा चेंडू लेग-साईडवर मारला आणि चेंडू आरामात षटकार मारण्यासाठी गेला.
आई झाली नाराज : नॅथन मॅकस्वीनीनं मारलेला चेंडू स्टँडमध्ये बसलेल्या लियाम हॅस्केटच्या वडिलांनी पकडला. पण ते अजिबात आनंदी दिसत नव्हते. यावेळी लियाम हॅस्केटची आई देखील स्टँडमध्ये उपस्थित होती, पण या खास क्षणी ती देखील रागावलेली दिसत होती. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटच्या इतिहासात अशी अनोखी घटना क्वचितच पाहिली गेली असावी असं मानलं जातंय.
अॅडलेड स्ट्रायकर्सनं जिंकला सामना :या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अॅडलेड स्ट्रायकर्सनं हा सामना 56 धावांनी जिंकला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, अॅडलेड स्ट्रायकर्सनं 20 षटकांत 5 गडी गमावून 251 धावांचा डोंगर उभारला. या लीगच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्या आहे. यादरम्यान, मॅथ्यू शॉर्टनं कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 54 चेंडूत 109 धावा केल्या, ज्यामध्ये 10 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. पण या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ब्रिस्बेन हीट संघ 20 षटकांत 195 धावा करुन सर्वबाद झाला. डार्सी शॉर्टनं सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा :
- एका डावात 10 विकेट घेणाऱ्या खेळाडूला संघात स्थान नाही; 12 नवीन खेळाडूंसह 'ब्लॅक कॅप्स'चा संघ जाहीर
- मराठमोळा क्रिकेटपटू करणार भाजपामध्ये प्रवेश? 'त्या' एका भेटीनं रंगली चर्चा