महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कोण होणार भारतीय संघाचा कर्णधार? BCCI नं दिले स्पष्ट संकेत - JASPRIT BUMRAH WILL LEAD TEAM INDIA

रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याच्या जागी कर्णधार कोण होणार अशी चर्चा सुरु होती.

Who will Lead Team India in Absence of Rohit
भारतीय संघ (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 12, 2024, 10:25 AM IST

मुंबई Who will Lead Team India in Absence of Rohit : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील 3 कसोटी सामन्यांची मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. ज्यासाठी बोर्डानं शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. निवड समितीनं बांगलादेशविरुद्ध जिंकलेला संघच कायम ठेवला आहे. याचा अर्थ स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याच्या पुनरागमनाला अजून वेळ लागेल. मात्र BCCI नं एक मोठा निर्णय घेत जसप्रीत बुमराहची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

संघात मोठे बदल नाही :BCCI नं न्यूझिलंडविरुद्ध मालिका सुरु होण्याच्या सुमारे 4 दिवस आधी शुक्रवारी रात्री उशिरा संघाची घोषणा केली. मात्र, गेल्या मालिकेतील निकाल आणि खेळाडूंची कामगिरी पाहता यावेळी संघात क्वचितच बदल होणार असल्याचं स्पष्ट झालं. निवड समितीनंही हाच विचार कायम ठेवत संघात स्थैर्य राखत त्याच खेळाडूंची निवड केली. मात्र, मागील मालिकेसाठी संघाचा भाग असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याची या मालिकेसाठी निवड झालेली नाही. पदार्पण न करताच त्याला वगळण्यात आलं आहे तर त्याच्या जागी अन्य कोणत्याही गोलंदाजाचा समावेश करण्यात आलेला नाही.

बुमराहची उपकर्णधारपदी वर्णी : या घोषणेतील सर्वात मोठी बातमी म्हणजे उपकर्णधाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी BCCI नं उपकर्णधारपदी कोणाचीही नियुक्ती केली नव्हती. मात्र आता याबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना बोर्डानं पूर्णविराम दिला आहे. या मालिकेत स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार असेल. रोहित शर्माच्या आजारपणानंतर बुमराहला याआधीही ही जबाबदारी मिळाली आहे आणि 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्यानं कर्णधारपदही भूषवलं आहे. निवड समितीचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा एक दिवसापूर्वीच कर्णधार रोहित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशा स्थितीत त्याच्या जागी कर्णधार कोण होणार, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. आता फक्त बुमराह ऑस्ट्रेलियात ही जबाबदारी घेऊ शकतो, असं संकेत BCCI नं दिले आहेत.

न्यूझिलंडविरुद्ध भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत दीपराह, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू : मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि प्रसीध कृष्णा

हेही वाचा :

  1. बांगलादेश सिमोल्लंघन करणार की दसऱ्याला भारत 'विजयाचं सोनं' लुटणार? शेवटचा T20 सामना 'इथं' पाहा लाईव्ह
  2. 'मेगा लिलावात गेलो, तर विकला जाईल की नाही...?' ऋषभ पंतचा मध्यरात्री चाहत्यांना प्रश्न, दिल्ली संघ सोडणार?

ABOUT THE AUTHOR

...view details