नवी दिल्ली ICC Player of the Month : टी 20 क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला त्याच्या कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे. आयसीसीनं जून महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. ज्यात पुरुष आणि महिला अशा दोन्ही पुरस्कारांमध्ये भारताचा दबदबा आहे. जसप्रीत बुमराहची जून महिन्यासाठी आयसीसीनं 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड केली आहे. त्याच्यासह या पुरस्कारासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानउल्ला गुरबाज हे स्पर्धेत होते.
बुमराहला उत्कृष्ट कामगिरीचं बक्षीस :जसप्रीत बुमराहनं टी 20 विश्वचषक स्पर्धेत 8 सामन्यांत 15 विकेट घेत चमकदार कामगिरी केली. बुमराहनं वेळोवेळी संघासाठी महत्त्वाची षटकं टाकली आणि भारताला सामना जिंकून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. हा पुरस्कार जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, "जूनसाठी आयसीसी पुरुष खेळाडू म्हणून निवडून आल्यानं मला आनंद होत आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये काही संस्मरणीय आठवडे घालवल्यानंतर हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे." तसंच मला आमचा कर्णधार रोहित शर्मा आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या याच कालावधीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करायचे आहे आणि मला विजेते म्हणून निवडल्याबद्दल खूप आनंद झाल्याचंही तो म्हणाला.