हैदराबाद Ishan Kishan Century : भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला इशान किशन पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. त्याचा भारतीय संघात समावेश होणार नाही, पण बुची बाबू स्पर्धेत झारखंड संघाकडून खेळताना त्यानं शानदार शतक झळकावून पुनरागमनाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. इशानचं शतक आणखी खास बनलं कारण त्याच्या संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आलं नाही. ईशाननं आपल्या संघासाठी एका बाजूनं शानदार फलंदाजी केली.
इशान किशननं मध्य प्रदेशविरुद्ध झळकावलं शतक : सध्या बुची बाबू स्पर्धा खेळवली जात आहे. झारखंड विरुद्ध मध्य प्रदेश सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेश संघानं 225 धावा केल्या आणि सर्व खेळाडू बाद झाले. संघानं 91.3 षटकं फलंदाजी केली. मध्य प्रदेशकडून शुभम कुशवाहानं सर्वाधिक 84 धावांची खेळी खेळली. तर अरहम अकीलनं 57 धावा केल्या. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. यानंतर झारखंडची फलंदाजी आली. इशान किशनशिवाय या संघातील अन्य कोणताही फलंदाज चांगला खेळ करु शकला नाही. इशान किशननं आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी सुरु ठेवत अवघ्या 86 चेंडूत शतक झळकावलं. ईशाननं आपलं शतक पूर्ण केलं तोपर्यंत संघानं 225 हून अधिक धावा केल्या होत्या. म्हणजे आता इथून संघाच्या धावसंख्येचं रुपांतर आघाडीत होईल. इशान किशननं दोन लागोपाठ सिक्स मारत आपलं शतक पूर्ण केलं.
इशाननं 107 चेंडूत केल्या 114 धावा : इशान किशननं आपल्या खेळीदरम्यान 107 चेंडूंचा सामना केला आणि 114 धावांची दमदार खेळी केली. यात त्यानं 5 चौकार तर 10 षटकार लगावले. मध्य प्रदेशच्या अधीर प्रताप सिंगच्या आउटगोइंग चेंडूला मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. मात्र, तोपर्यंत झारखंडची एकूण धावसंख्या 252 धावांपर्यंत पोहोचली होती. आता सामन्याचा निकाल काय लागतो हे पाहायचं आहे. इशान किशन व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले इतर अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळतात, त्यांच्यावरही लक्ष असणार आहे.
बांगलादेश कसोटी मालिकेसाठी इशानच्या नावाचा विचार : भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या संघाची घोषणा केली जाईल, असं मानलं जात आहे. याआधी खेळाडूंना चांगली कामगिरी करुन निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेण्याची उत्तम संधी आहे. आता या खेळीनंतर इशान किशनचं भारतीय संघात पुनरागमन होतं की त्याला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार हे पाहणं बाकी आहे.
हेही वाचा :
- फलंदाज सुस्त, गोलंदाज मस्त... कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पडल्या 17 विकेट - WI vs SA test
- हॉटस्टार, जिओ सिनेमावर नव्हे तर कुठे बघता येईल वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका 'कसोटी'? - Where to watch WI vs SA Test