मुंबई MI CSK Players Retention for IPL 2025 : IPL 2025 पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे, जो या वर्षाच्या अखेरीस आयोजित केला जाऊ शकतो. BCCI कडून खेळाडूंना कायम ठेवण्याचं धोरण लवकरच जाहीर केलं जाऊ शकतं. दरम्यान, BCCI आयपीएल फ्रँचायझीला 5 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. ज्यात 3 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. गेल्या वेळी सर्व संघांनी प्रत्येकी केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवलं होतं. मात्र यावेळी राईट टू मॅच नियम काढून टाकला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, लिलावापूर्वी सर्व आयपीएल फ्रँचायझी कोणते 5 खेळाडू कायम ठेवू शकतात त्यांची संभाव्य यादी.
चेन्नई सुपर किंग्ज
एमएस धोनीचं नाव चेन्नई सुपर किंग्जच्या कायम ठेवण्याच्या यादीत पुन्हा एकदा येऊ शकतं. अशा परिस्थितीत तो आणखी एका मोसमात खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडलाही कायम ठेवण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याशिवाय रवींद्र जडेजा तिसरा भारतीय म्हणून संघाचा भाग बनू शकतो. याशिवाय परदेशी खेळाडू म्हणून रचिन रवींद्र आणि मथिशा पाथिराना हे खेळाडू कायम ठेवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स संघासाठी 5 खेळाडूंची निवड करणं खूप कठीण जाणार आहे. मात्र, संघाचा कर्णधार शुभमन गिलला कायम ठेवण्यात येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याच्याशिवाय साई सुदर्शन आणि मोहम्मद शमी हे संघाची पहिली पसंती असू शकतात. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर राशिद खानचं नाव आघाडीवर असू शकते आणि संघ पुन्हा एकदा डेव्हिड मिलरवर विश्वास व्यक्त करु शकतो.
कोलकाता नाईट रायडर्स
गेल्या मोसमातील चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्ससाठी 5 खेळाडू रिटेन करणं हे एखाद्या टेन्शनपेक्षा कमी नाही. गेल्या मोसमात त्यांच्या संघाचे संयोजन खूप चांगलं होतं. त्यामुळं ते विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले होते. अशा स्थितीत ते कोणते 5 खेळाडू कायम ठेवणार हे पाहायचं आहे. मात्र, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती संघाची पहिली पसंती असू शकतात. त्याचवेळी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल हे संघातील सर्वात जुने खेळाडू आहेत, ज्यांना पुन्हा एकदा कायम ठेवलं जाऊ शकतं.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स संघातील 5 खेळाडू जवळपास निश्चित मानले जात आहेत. यात कर्णधार ऋषभ पंतसोबतच अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही रिटेन्शन लिस्टमध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्याच वेळी, संघ नेहमीच तरुण खेळाडूंवर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि ट्रिस्टियन स्टब्स हे युवा परदेशी खेळाडू पुन्हा एकदा या संघाचा भाग होऊ शकतात.
लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल पुन्हा एकदा लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी पहिली पसंती ठरु शकतो. त्याचवेळी रवी बिश्नोई आणि आयुष बडोनी यांनाही लखनऊ सुपरजायंट्सकडून कायम ठेवल्या जाऊ शकतं. याशिवाय निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस हे विदेशी खेळाडू म्हणून कायम ठेवण्याची शर्यत जिंकू शकतात.