गुवाहाटी IPL 2024 RR vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात 65वा सामना खेळवण्यात आला. गुवाहाटी इथल्या बारसापारा क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाब संघानं राजस्थान संघावर विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पंजाब संघाला पंजाबसमोर 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पंजाब संघानं 5 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं. सुरुवातीला 50 धावात त्यांचे 4 गडी बाद झाले होते, मात्र त्यानंतर कर्णधार सॅम करननं जितेश शर्माच्या साथीनं डाव सावरला.
राजस्थानचा 145 धावात गुंडाळण्यात यश : या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघानं 42 धावांवर 3 विकेट गमावल्या. त्यानंतर 92 ते 102 धावांमध्ये आणखी 3 गडी गमावले. मात्र, आपल्या घरच्या मैदानावर रियान परागनं एक बाजू लावून धरत शानदार खेळी केली. त्यामुळे राजस्थान संघानं 9 गडी गमावून 144 धावा केल्या. रियान परागचं अर्धशतक मात्र हुकलं. त्यानं 34 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तर रविचंद्रन अश्विननंही 28 धावा केल्या. त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. पंजाबकडून सॅम कुरन, हर्षल पटेल आणि राहुल चहर यांनी 2-2 बळी घेतले. तर अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिसनं 1-1 बळी घेतला.
राजस्थान संघावर पंजाबचा विजय :राजस्थान संघानं दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. धडाकेबाज गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानं पहिल्याच षटकात पंजाबला जोरदार धक्का दिला. ट्रेंट बोल्टनं प्रभसिमरन सिंहला 6 धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर राइले रुसो 22 धावा काढून चालता झाला. तर जॉनी बेअरस्टो सपशेल अपयशी ठरला. त्यानं 22 चेंडूत 14 धावा करुन तंबूची वाट धरली. शशांक सिंह यानंही भोपळा न फोडता तंबूची वाट धरली. त्यामुळे पंजाबनं केवळ 48 धावात 4 गडी गमावले. त्यानंतर मात्र पंजाबचा कर्णधार सॅम करननं डावाची सूत्रं आपल्या हाती घेतली. सॅम करन 41 चेंडूत 63 धावा करुन नाबाद राहिला. त्याला जितेश शर्मा यानं मोलाची साथ देत 20 चेंडूत 22 धावा करुन नाबाद राहिला. राजस्थान संघाकडून आवेश खान आणि युझवेंद्र चहलनं प्रत्येकी 2-2 बळी घेतले. सॅम करन यानं गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केल्यानं त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राजस्थान संघ पराभवानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.