अहमदाबाद GT vs CSK IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या हंगामात शुक्रवारी 59व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात संघानं तुफान फलंदाजी केली. गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकाच्या जोरावर गुजरात संघानं चेन्नईच्या संघाला 232 धावांचं लक्ष्य दिलं. मात्र प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ केवळ 196 धावाच करू शकला.
शुभमन गिल, साई सुदर्शनची तुफान फटकेबाजी : प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघानं 3 गडी गमावून 231 धावांचा डोंगर उभारला. गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतकी खेळी खेळली. गिलनं 55 चेंडूत 9 चौकार आणि सहा षटकारांच्या आतषबाजीसह 104 धावा चोपल्या. तर साई सुदर्शननं 51 चेंडूत 103 धावांची तुफान खेळी केली. साई सुदर्शननं आपल्या खेळीत सात षटकार आणि पाच चौकार लगावले. शुभमन गिलच्या आयपीएल कारकिर्दीतील हे चौथं शतक ठरलं, तर साई सुदर्शननं आयपीएलमध्ये पहिल्यांदाच शतक ठोकलं.
शुभमन गिल आणि साई सुदर्शननं रचला इतिहास :गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात झालेल्या सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी इतिहास रचला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही संयुक्त सर्वात मोठी सलामीची भागीदारी होती. गिल-सुदर्शननं क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली. डीकॉक-राहुल यांनी आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिल्या विकेटसाठी नाबाद 210 धावा जोडल्या होत्या. त्यासह एका डावात शतक झळकावणारी गिल-सुदर्शन ही तिसरी सलामीची जोडी ठरली.