चेन्नई IPL 2024 CSK vs RR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 61व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) नं राजस्थान रॉयल्सचा (RR) पाच गडी राखून पराभव केलाय. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं यजमान संघाला विजयासाठी 142 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी 18.2 षटकांत पूर्ण केलं. चालू हंगामातील 13 सामन्यांमधला सीएसकेचा हा सातवा विजय ठरला. गुणतालिकेत ते आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडं राजस्थान रॉयल्सचा 12 सामन्यांमधला हा चौथा पराभव ठरला.
गायकवाडची संयमी खेळी : चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार रुतुराज गायकवाडनं 41 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी केली. ज्यात दोन षटकार आणि एक चौकार समाविष्ट होता. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराजनं शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजयापर्यंत नेलं. सलामीवीर रचिन रवींद्रनंही 18 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं 27 धावा केल्या. राजस्थानसाठी आर अश्विननं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नांद्रे बर्जर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
रियान परागमुळं सन्मानजनक धावसंख्या : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 5 गडी गमावून 141 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागनं सर्वाधिक 35 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी खेळली. रियननं या खेळीत तीन षटकारांसह एक चौकारही मारला. तर ध्रुव जुरेलनंही 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 28 धावांची खेळी केली. सीएसकेकडून सिमरजीत सिंगनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर तुषार देशपांडनं दोन बळी संपादन केले.