हरारे ZIM vs IND 4th T20I :भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 क्रिकेट मालिकेतील चौथा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबवर झाला. या सामन्यात भारतानं 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारतासमोर सामना जिंकण्यासाठी 153 धावांचं लक्ष्य होतं, ते त्यांनी 15.2 षटकांतच पूर्ण केलं. या विजयासह भारतीय संघानं मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दरम्यान मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी 20 सामना रविवार 14 जुलै रोजी याच मैदानावर होणार आहे.
10 गड्यांनी दणदणीत विजय : धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी शानदार फलंदाजी करत यजमान संघाला एकही विकेट दिली नाही. यशस्वीनं 53 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 93 धावा केल्या. तर कर्णधार गिलनं 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 58 धावांची खेळी केली. दोन्ही खेळाडूंनी 156 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
कर्णधार रझाची एकाकी झुंज : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान झिम्बाब्वेनं सात गडी गमावून 152 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझानं सर्वाधिक 28 चेंडूत 46 धावांची खेळी खेळली, ज्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. सलामीवीर तदिवनाशे मारुमणीनं 32 आणि वेस्ली माधवेरेनं 25 धावांचं योगदान दिले. माधेवर-मारुमणी यांनी पहिल्या विकेटसाठी 52 चेंडूत 63 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर ठराविक अंतरानं झिम्बाब्वेचे फलंदाज बाद होत गेले. भारताकडून खलील अहमदनं सर्वाधिक दोन बळी घेतले. तर अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.