हरारे IND vs ZIM 3rd T20I : भारतीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतीय संघानं झिम्बाब्वेसमोर 183 धावांचं लक्ष्य ठेवलं. परंतु झिम्बाब्वेचा संघ 6 बाद 159 धावांत मर्यादित राहिला. परिणामी भारतानं हा सामना 23 धावांनी जिंकत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना याच मैदानावर 13 जुलै रोजी होणार आहे.
डिऑन मायर्सची अर्धशतकी खेळी : झिम्बाब्वेकडून फलंदाजी करताना डिऑन मायर्सनं सर्वाधिक 49 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी खेळली. तर यष्टीरक्षक क्लाइव्ह मदंडेनं 26 चेंडूत 37 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. तर भारतीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदरनं 3 आणि आवेश खाननं 2 बळी घेतले. खलील अहमदनंही एक विकेट घेतली.
गिलचं अर्धशतक, गायकवाडची उपयुक्त खेळी : या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 4 गडी गमावून 182 धावा केल्या. यशस्वी जैस्वालनं शुभमन गिलच्या साथीनं सलामी दिली. गिलनं कर्णधारपदाची खेळी खेळताना 49 चेंडूत 66 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 3 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर यशस्वीनंही 36 धावा केल्या. याशिवाय मधल्या फळीत ऋतुराज गायकवाडनं 28 चेंडूत 49 धावांची खेळी केली. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं, मात्र त्याला केवळ 10 धावा करता आल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार आणि फिरकी गोलंदाज सिकंदर रझानं 2 बळी घेतले. याशिवाय मुजराबानीनंही 2 बळी मिळवले.