नवी दिल्ली Ban of Cricket : एकीकडं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) जगभरात क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी अनेक पावलं उचलत आहे. इतकंच काय तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी क्रिकेटबाबत अशी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळं चाहत्यांना धक्का बसला आहे.
क्रिकेट खेळण्यावर बंदी : वास्तविक, उत्तर इटलीतील एका शहरात क्रिकेटवर बंदी घातली आहे. हा खेळ खेळणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांना स्थानिक सांस्कृतिक वारशासाठी धोका मानणाऱ्या तिथल्या महापौरांनी हा निर्णय घेतला आहे. बीबीसीच्या एका अहवालानुसार, उत्तर इटलीतील मोनफाल्कोन शहरात अधिकृतपणे या खेळावर बंदी घातली आहे आणि त्याच्या मर्यादेत क्रिकेट खेळताना आढळलेल्यांना 100 युरो पाउंड (सुमारे 10 हजार रुपये) पर्यंत दंड ठोठावला आहे. या बंदीमुळं इटलीच्या एड्रियाटिक किनाऱ्याजवळ वसलेल्या मोनफॉलकोन शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
काय म्हणाले महापौर : हे लक्षात घेण्यासारखं आहे की सुमारे 30,000 लोकसंख्या असलेल्या या शहरात, सुमारे एक तृतीयांश रहिवासी परदेशी आहेत. त्यात प्रामुख्यानं बांगलादेशी मुस्लिमांचा समावेश आहे, जे 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात एका मोठ्या शिपयार्डमध्ये काम करण्यासाठी इथं आले होते. मॉनफाल्कोनच्या महापौर अण्णा मारिया सिसिंट यांनी सांगितलं की, त्यांना त्यांचं शहर आणि ख्रिश्चन मूल्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे. आमचा इतिहास पुसला जात आहे. त्यात काही अर्थ उरलेला नाही असं दिसतं, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं,
क्रिकेट बॉलमुळं होऊ शकते दुखापत : बांगलादेशी समाजानं शहरासाठी काहीही योगदान दिलेलं नसून इतरत्र खेळावं, असं महापौर सिसिंट यांनी म्हटलं आहे. क्रिकेट खेळपट्टी बांधण्यासाठी जागा किंवा पैसा नाही आणि क्रिकेट बॉलमुळं कोणालाही दुखापत होऊ शकते, असाही युक्तिवाद त्यांनी केला. तसंच 'त्यांनी (बांगलादेशातील लोकांनी) या शहराला, आमच्या समुदायाला काहीही दिलेलं नाही. ते मोनफाल्कोनच्या बाहेर कुठेही जाऊन क्रिकेट खेळायला मोकळे आहेत,' असंही त्यांनी म्हटलंय. अण्णा मारिया सिसिंट यांना मुस्लिम विरोधी मानलं जातं. मुस्लिमांबद्दलच्या मतांमुळं महापौरांनाही जीवं मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि त्यांना 24 तास पोलिस संरक्षणात ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा :