क्वालालंपूर ICC U19 Womens World Cup : सध्या मलेशियात महिलांचा 19 वर्षांखालील T20 क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. ज्यात भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात आला. भारतीय महिला संघानं हा सामना 9 विकेट्सनं जिंकला आहे. भारताच्या विजयासह, इंग्लंडचा स्पर्धेतील प्रवास इथं संपला आणि टीम इंडियानं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. महिला 19 वर्षांखालील T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. यासह भारतीय महिला संघानं सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
कसा राहिला सामना :या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, त्यांचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आणि 20 षटकांत 8 गडी गमावल्यानंतर त्यांना फक्त 113 धावा करता आल्या. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर आयुषी शुक्लानं दोन विकेट मिळवल्या. इंग्लंडकडून फक्त डेव्हिना पेरिन आणि अबी नॉरग्रोव्ह यांनीच फलंदाजीत चांगली खेळी केली. डेव्हिना पेरिननं 45 आणि अबी नॉरग्रोव्हनं 30 धावा केल्या.