कोलंबो SL vs IND 2nd ODI : श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 32 धावांनी पराभव केला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याप्रमाणे यावेळीही टीम इंडियाला चांगली सुरुवात झाली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजीच्या अपयशामुळे संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. श्रीलंकेच्या संघाला तब्बल 3 वर्षांनंतर भारताला वनडे सामन्यात पराभूत करण्यात यश आलं. यजमान श्रीलंकेसाठी जेफ्री वेंडरसेनं 6 बळी घेतले. या सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला 241 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ 208 धावांत गारद झाला. भारत-श्रीलंकेत 5 ऑगस्टला अंतिम सामना आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळविला तर मालिका बरोबरीत सुटणार आहे.
भारताची फलंदाजी : लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारत मैदानात उतरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 97 धावांची सलामी भागीदारी झाली. रोहितने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं आपल्या खेळीत 44 चेंडूत 64 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 5 चौकार आणि 4 षटकार मारले. तर गिलनं 35 धावांचं योगदान दिलं. विराट कोहली 19, श्रेयस अय्यर 7, अक्षर पटेलने 44 धावा तर शिवम दुबे आणि केएल राहुल खातं न उघडता तंबूत परतले.
श्रीलंकेनं 3 वर्षांनी केला भारताचा पराभव : एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा जुलै 2021 मध्ये शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी भारताला 32 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेबद्दल बोलायचं झालं तर श्रीलंकेने 1997 मध्ये वनडे मालिकेत भारतीय संघाचा शेवटचा पराभव केला होता. या मालिकेतील शेवटचा सामना जर श्रीलंकेने जिंकला तर ते 27 वर्षांनंतर भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकतील.
- जेफ्री वेंडरसेची जबरदस्त गोलंदाजी : जेफ्री वेंडरसेने 6 विकेट घेत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 6 विकेट घेतले. तर श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने अक्षर पटेल (44), वॉशिंग्टन सुंदर (15), मोहम्मद सिराज (4) यांना बाद केलं.
- भारताचं वर्चस्व : भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 170 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात भारतानं 99 सामने जिंकले, तर श्रीलंकेनं 58 सामने जिंकले. तर 11 सामने अनिर्णित राहिले असून दोन सामने बरोबरीत राहिले आहेत.