Jasprit BumrahRecord :टी-20 विश्वचषक 2024 चा 19 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला. भारत-पाकिस्तानमधील हा सामना खूपच उत्कंठावर्धक होता. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 120 धावांचं लक्ष्य होतं. मात्र पाकिस्तानला सात गडी गमावून केवळ 113 धावाच करता आल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्धच्या आठ सामन्यांमधला हा सातवा विजय ठरलाय. टीम इंडियाला हा सामना जिंकून देण्यात टीमचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली. त्यामुळं जसप्रीत बुमराहला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
जसप्रीत बुमराहने इतिहास रचला :या सामन्यात एकूण 3 विकेट घेत जसप्रीत बुमराह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्यानं अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मागे टाकलं आहे. युजवेंद्र चहल हा भारताकडून सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय बळी घेणारा गोलंदाज आहे. चहलनं 80 टी-20 सामन्यांच्या 79 डावांमध्ये गोलंदाजी करताना एकूण 96 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर भुवनेश्वर कुमारचं नाव दुसऱ्या क्रमांकावर येतं. भुवनेश्वर कुमारनं 87 सामन्यांच्या 86 डावात 90 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर आता जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बुमराहने आतापर्यंत 64 सामन्यांच्या 63 डावांमध्ये 79 बळी घेतले आहेत.
जसप्रीत बुमराहची प्रतिक्रिया : भारताला 6 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिल्यावर जसप्रीत बुमराह म्हणाला, "खरंच छान वाटतंय. आम्हाला वाटलं की, आम्ही थोडे कमजोर पडलो. आम्ही फलंदाजीत कमी धावा केल्या होत्या. पण आमची गोलंदाजी चांगली झाली. या सामन्यात आम्ही शक्य तेवढं चांगल करण्याचा प्रयत्न केला. सर्व काही चांगलं झालं म्हणून मला आनंद झालाय. अमेरिकेतील क्रिकेट समर्थकांकडून टीम इंडियाला मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ''आम्ही भारतात खेळत आहोत असं आम्हाला वाटतं होतं. समर्थकांकडून एवढा पाठिंबा मिळाल्यानं खरोखर आनंद झालाय. समर्थकांमुळे आम्हाला मैदानावर ऊर्जा मिळते.”