रांची IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडनं पहिल्या दिवशी सात गडी गमावत 90 षटकांत 302 धावा केल्या. तसंच जो रूटनं त्याच्या कारकिर्दीतील 31 वं कसोटी शतकही पूर्ण केलं. यावेळी रूट 106 आणि ऑली रॉबिन्सन 31 धावा करून नाबाद परताल.
आकाशदीपनं घेतले सर्वाधिक 3 बळी :जो रूट तसंच बेन फोक्स यांनी दुपारच्या जेवानंतर (112/5) इंग्लंडचा डाव पुढं नेला. चहापानाच्या ब्रेकपर्यंत इंग्लंडनं 5 विकेट गमावून 198 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बेन फॉक्स आक्रमक दिसला, मात्र मोहम्मद सिराजनं त्याला (47) धावांवर बाद केलं. त्यानंतर सिराजनेच भारताला सातवी विकेट मिळवून दिली. भारतानं या इनिंगचे सर्व रिव्ह्यू गमावले आहेत. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या आकाशदीपनं सर्वाधिक 3 बळी घेतले, तर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1 यश मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बेन डकेट, जॅक क्रॉलीनं इंग्लंडच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, आकाशदीपचा भेदक गोलंदाजीपुढं इंग्लडच्या फलंदाजांना टिकाव धरता आला नाही.
आकाशदीपनं मिळवून दिलं भारताला पहिलं यश :या सामन्यात पदार्पण करणाऱ्या आकाशदीपनं चांगली कामगिरी केलीय. प्रथम, त्यानं डावाच्या 10व्या षटकात बेन डकेट (11) याला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिलं. त्यानंतर त्याच षटकात त्यानं ऑली पोप (0)लाही बाद केलं. या धक्क्यातून सावरत असतानाच आकाशदीपनं डावाच्या 12व्या षटकात जॅक क्रॉलीला (42) धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर अश्विननं जॉनी बेअरस्टोला (38) धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केलं. जेवणापूर्वी रवींद्र जडेजानं इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्सला एलबीडब्ल्यू (3) बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.