विशाखापट्टणम IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम इथं खेळवला जातोय. पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 6 बाद 336 धावा आहे. विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावावर राहिला. यशस्वी जैस्वाल 257 चेंडूत 179 धावा करुन नाबाद परतला. त्यानं आपल्या खेळीत 17 चौकार आणि 5 षटकार मारले.
पहिला दिवस यशस्वी जैस्वालच्या नावावर : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत राहिले. पण यशस्वी जैस्वाल यानं एक बाजू सांभाळत फलंदाजी केली. भारतीय संघाला पहिला धक्का 40 धावांवर बसला. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 14 धावा करुन बाद झाला. यानंतर शुभमन गिल 34 धावा करुन जेम्स अँडरसनचा बळी ठरला. तर श्रेयस अय्यरनं 27 धावा केल्या. श्रेयस अय्यरला टॉम हार्टलीनं बाद केलं. तर आपल्या पहिल्याच सामन्यात रजत पाटीदार 32 धावा करुन रिहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.
भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद : भारतीय फलंदाजांनी सकाळी चांगली सुरुवात केली होती. परंतु, भारतीय संघाचे फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचं मोठ्या धावसंख्येमध्ये रुपांतर करता आलं नाही. अष्टपैलू अक्षर पटेलही 27 धावा करुन बाद धाला. तर यष्टीरक्षक फलंदाज के एस भरतही 17 धावा करुन रिहान अहमदच्या चेंडूवर बाद झाला. इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रिहान अहमद यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले. याशिवाय जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि रवी अश्विन नाबाद परतले. भारतीय संघ दुसऱ्या दिवशी 6 बाद 336 धावांवर खेळण्यास सुरुवात करेल. तसंच यशस्वी जैस्वाल द्विशतक करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
रजत पाटीदारचं पदार्पण : हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरलेल्या मोहम्मद सिराजला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. त्याच्या जागी मुकेश कुमारला टीममध्ये संधी मिळाली. पहिला सामना खेळलेले केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी विकेटकीपर रजत पाटीदारनं कसोटी पदार्पण केलं, तर कुलदीप यादवचं संघात पुनरागमन झालं आहे.