दुबई Prize Money For T20 Women's World Cup : महिला T20 क्रिकेटला 8 वर्षांनंतर एक नवा विश्वविजेता मिळाला आहे. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावत गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन महिला संघाची राजवट संपवली. रविवारी 20 ऑक्टोबर रोजी दुबई इथं खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव केला आणि यासह तिसरा अंतिम सामना खेळून प्रथमच विजेतेपदावर कब्जा केला. न्यूझीलंडला चमकदार विश्वचषक ट्रॉफी मिळाली आणि सुमारे 20 कोटी रुपयांचं बक्षीसही मिळालं. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेलाही 10 कोटी रुपये मिळाले, तर साखळी फेरीत बाहेर पडलेल्या भारतीय संघालाही काही रक्कम मिळाली.
कीवी संघानं प्रथमच जिंकला विश्वचषक : 3 ऑक्टोबर रोजी UAE मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेचा समारोप 20 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यानं झाला. या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 158 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसाठी खूप मोठं ठरले आणि त्यांचा संपूर्ण संघ 20 षटकांत केवळ 126 धावा करु शकला. अशाप्रकारे न्यूझीलंडनं प्रथमच T20 विश्वचषक जिंकण्यात यश मिळवलं. तर दक्षिण आफ्रिकेचं विजेतेपद पुन्हा एकदा हुकलं. गतवर्षीही त्यांना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
विश्वविजेता न्यूझीलंड संघ मालामाल : या विजयासह, न्यूझीलंडला प्रथमच महिला T20 विश्वचषकाची सुंदर ट्रॉफी मिळाली, परंतु केवळ ट्रॉफीच नाही, तर न्यूझीलंडला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ होण्याचं जबरदस्त बक्षीसही मिळालं आहे. विशेष म्हणजे ICC नं यावेळी महिला T20 विश्वचषकाच्या बक्षीस रकमेत दुप्पट वाढ केली होती. अशाप्रकारे चॅम्पियन न्यूझीलंडला 2.34 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 19.67 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. महिला T20 विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही विजेत्या संघाला मिळालेली ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. याशिवाय साखळी फेरीमधील एक सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला 26.19 लाख रुपये दिले जातील. न्यूझीलंडनं साखळी फेरीमध्ये 3 सामने जिंकले होते, त्यामुळं त्यांना 78 लाख रुपये अतिरिक्त मिळतील. अशा प्रकारे न्यूझीलंडला सुमारे 20.45 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील.
दक्षिण आफ्रिका आणि भारताला किती रुपये : उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 1.17 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 9.83 कोटी रुपयांचं बक्षीस मिळेल. दक्षिण आफ्रिकेनंही साखळी फेरीमध्ये 3 सामने जिंकले आणि त्यामुळं त्यांना 78 लाख रुपये अतिरिक्त मिळतील. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा संघ एकूण 10.62 कोटी रुपये घेऊन जाणार आहे. तर भारतीय संघाबाबत बोलायचं झालं तर स्पर्धेतील त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळं त्यांना मिळणाऱ्या रकमेवरही परिणाम झाला. भारतीय संघ साखळी फेरीमध्येच बाहेर पडला. मात्र, भारतीय संघानं आपल्या ग्रुपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत केलं होतं आणि त्यामुळं हे 2 सामने जिंकल्यामुळं भारतीय संघाला फक्त 52 लाख रुपये मिळतील.
हेही वाचा :
- विराट कोहलीसह 'हे' दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाले 0व्या चेंडूवर आउट
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेश पहिला सामना जिंकणार? पहिली कसोटी 'इथं' पाहा लाईव्ह