नवी दिल्ली Hockey India : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावून खेळातून निवृत्त झालेल्या स्टार गोलकीपर पीआर श्रीजेशच्या सन्मानार्थ हॉकी इंडियानं बुधवारी वरिष्ठ संघाची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. भारतीय हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिकमध्येही तिसऱ्या क्रमांकावर राहून सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकलं होतं.
पीआर श्रीजेश ज्युनियर संघाचा प्रशिक्षक : हॉकी इंडियाचे सचिव भोला नाथ सिंग यांनी जाहीर केलं की भारतीय गोलकीपर आता ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावेल. श्रीजेश आता ज्युनियर संघाचा प्रशिक्षक बनणार आहे आणि आम्ही वरिष्ठ संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करत आहोत. आम्ही कनिष्ठ संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करत नाही. तसंच श्रीजेश ज्युनियर संघात आणखी एका श्रीजेशला तयार करेल, असं अनुभवी खेळाडूच्या सत्कार समारंभात भोला नाथ सिंग म्हणाले.
श्रीजेशनं ऑलिम्पिकमध्ये केली चमकदार कामगिरी :पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघानं चमकदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकलं. संघाचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशनं सर्व सामन्यांमध्ये महत्त्वाच्या वेळी गोल वाचवले आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीजेशनं ग्रेट ब्रिटनविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन गोल वाचवून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
2006 मध्ये केलं पदार्पण : श्रीजेशनं 2006 मध्ये भारताकडून पदार्पण केलं. पण 2011 नंतर तो कधीही संघाबाहेर नव्हता. त्यानं 18 वर्षात भारतीय संघासाठी 336 सामने खेळले आहेत, या दरम्यान त्यानं 4 ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि दोन वेळा पदकंही जिंकली आहेत.
हेही वाचा :
- भारतीय हॉकी संघानं पॅरिसमध्ये 52 वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती; स्पेनचा पराभव करत देशाला मिळवून दिलं चौथं पदक - paris olympics 2024
- हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेशचा मोठा सन्मान! मनू भाकरसोबत ऑलिम्पिकमध्ये मिळाली 'ही' मोठी जबाबदारी - Paris Olympics 2024
- भारताचं 44 वर्षानंतरचं स्वप्न भंगलं; हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा जर्मनीकडून पराभव, आता स्पेनविरुद्ध होणार लढत - Paris Olympics 2024 Hockey