कोलकाता Virat Kohli : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जून ते 29 जून या कालावधीत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारतीय संघात स्थान मिळवू शकेल की नाही याबद्दल त्याच्या काही चाहत्यांना शंका होती. पण, चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. सध्याच्या परिस्थितीत कोहली हा बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून खेळला जाणार आहे.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) 'ईटीव्ही भारत'ला या आगामी टी-20 विश्वचषकाची माहिती दिलीय. बोर्डाच्या एका विश्वसनीय सूत्रानं सांगितलं की, "आयपीएलनं अजून अर्धा टप्पाही गाठलेला नाही. पण कोहलीनं 146 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं आधीच 300 हून अधिक धावा केल्या आहेत. देशासमोर आजही त्याच्यापेक्षा चांगला पर्याय नाही."
कामगिरीतून केलं स्वतःला सिद्ध : क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल कोहलीकडे सिद्ध करण्यासाठी काहीही नव्हतं. परंतु, इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये त्याच्या अलीकडील फलंदाजीनं या अटकळांना आता पूर्णविराम दिलाय. आत्तापर्यंत, कोहली (316) हा आयपीएलच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यात अलीकडेच राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतकही समाविष्ट आहे. कोहलीनं नोव्हेंबर 2022 पासून भारतासाठी फक्त दोन टी-20 खेळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं हे सामने खेळले आहेत. आकडेवारीनुसार कोहलीनं 117 सामन्यांच्या 109 डावांमध्ये 51.75 च्या सरासरीनं आणि 138 च्या स्ट्राइक रेटनं त्यानं 4037 धावा केल्या.