बार्बाडोस ENG Beat WI By 8 Wickets : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघानं T20 मध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी 8 विकेट्सनं वेस्ट उंडिजचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
सॉल्टनं झळकावलं तिसरं शतक : या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. इंग्लंडनं 183 धावांचं लक्ष्य अवघ्या 16.5 षटकांत पूर्ण केलं. त्यासाठी फिलिप सॉल्टनं 54 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 मधील त्याचं हे तिसरं शतक आहे. विशेष म्हणजे त्यानं तिन्ही शतकं फक्त वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजाचं हे सातवं शतक आहे. एकट्या सॉल्टनं त्यापैकी तीन लावले आहेत. त्याच्याशिवाय ॲलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 शतक झळकावलं आहे.
वेस्ट इंडिजचे फलंदाज अपयशी : इंग्लंडच्या या विजयात सॉल्टशिवाय साकिब महमूदच्या गोलंदाजीचाही महत्त्वाचा वाटा आहे. महमूदनं सुरुवातीच्या षटकांमध्येच वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरचा नाश केला. मात्र, विंडीजच्या मधल्या फळीच्या फलंदाजांनी काही चांगल्या खेळी केल्या. रोमारियो शेफर्ड आणि गुडाकेश मोटी यांनी मिळून वेगवान धावा केल्या पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना रोखलं. परिणामी वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरननं 29 चेंडूत 38 धावा, रोमारियो शेफर्डनं 22 चेंडूत नाबाद 35 धावा, मोटीनं 14 चेंडूत नाबाद 33 आणि आंद्रे रसेलनं 17 चेंडूत 30 धावा केल्या. इंग्लंडकडून शाकिबशिवाय आदिल रशीदनंही 3 बळी घेतले.