पर्थ Indian Players yet to Play Test Match : बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. उभय संघांमधील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर होणार आहे. पण नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुभमन गिल पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाहीत. यामुळं भारतीय संघासमोरच संकट वाढलं आहे, कारण हे दोन्ही खेळाडू याआधी ऑस्ट्रेलियात खेळले होते आणि तिथल्या परिस्थितीची त्यांना चांगली जाणीव होती. तर संघ व्यवस्थापनाची दुसरी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे भारतीय कसोटी संघात असे 8 खेळाडू आहेत ज्यांनी यापूर्वी कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळलेला नाही.
3 खेळाडूंनी अद्याप कसोटीत पदार्पणच केलेलं नाही : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय कसोटी संघात अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश रेड्डी, आकाश दीप, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णासह 8 खेळाडू आहेत. परंतु या खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी सामना खेळलेला नाही आणि या खेळाडूंना जास्त कसोटी सामने खेळण्याचा अनुभवही नाही. 8 पैकी तीन खेळाडू (अभिमन्यू इसवरन, हर्षित राणा, नितीश रेड्डी) तर असे आहेत ज्यांनी अद्याप कसोटी पदार्पणच केलेलं नाही. आता कमी अननुभवी खेळाडूंची निवड करण्याच्या भारतीय निवडकर्त्यांच्या हालचाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध उलटू शकतात. आता या खेळाडूंना भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास हे सर्व खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळतील.
अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता : रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. अशा स्थितीत अभिमन्यू ईश्वरनला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते आणि तो यशस्वी जैस्वालसोबत सलामीचा प्रबळ दावेदार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं धावांचे डोंगर रचले आहेत. त्यानं आतापर्यंत 101 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7674 धावा केल्या आहेत, ज्यात 27 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे ध्रुव जुरेल, आकाश दीप आणि हर्षित राणा यांनाही पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.