मुंबई Sachin Tendulkar on Vinesh Disqualification : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटसाठी गेले काही दिवस निराशाजनक गेले. आता 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरही विनेशच्या समर्थनार्थ पुढं आला आहे. महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेशचं वजन निर्धारित मानकांपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं लक्षात आलं, त्यामुळं तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. आता सचिननं याबाबत नाराजी व्यक्त केली असून विनेश रौप्यपदकाची पूर्णपणे दावेदार असल्याचं म्हटलं आहे.
सचिननं व्यक्त केली नाराजी : सचिन तेंडुलकरनं विनेशच्या समर्थनार्थ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "प्रत्येक खेळाचे नियम असतात आणि त्या नियमांना संदर्भानं पाहिलं पाहिजे. विनेश फोगटनं कोणतीही बेईमानी न करता अंतिम फेरी गाठली होती. वजनामुळं झालेली तिची अपात्रता अंतिम सामन्यापूर्वी आलेली आहे. म्हणून मला वाटतं की तिला रौप्यपदक न देणं हा निव्वळ अप्रामाणिकपणा असेल आणि अशा नियमांना काही अर्थ नाही." तसंच विनेश फोगटनं पहिल्याच फेरीत गत ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभूत करुन सर्वांनाच थक्क केलं होतं. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि अंतिम फेरीतही तिनं कोणतंही फाऊल न करता सामना जिंकला. अशा स्थितीत तिला निदान रौप्यपदक तरी का देऊ नये? नियमानुसार, तिला पुन्हा अंतिम फेरीत भाग घेण्याची परवानगी नव्हती, परंतु तिला रौप्यपदकापासून वंचित ठेवणं पूर्णपणं अन्यायकारक असल्याचं सचिननं म्हटलंय.