नैरोबी (केनीया) Biggest win in T20Is : T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दररोज काही ना काही रेकॉर्ड बनवले जातात आणि मोडले जातात. परंतु 23 ऑक्टोबर रोजी नैरोबीमध्ये एक सामना खेळला गेला ज्यात विक्रमांची मालिकाच तयार झाली. या सामन्यात एका संघानं 300 हून अधिक धावा करत नवा विक्रम केला. या सामन्यात एक-दोन नव्हे तर चार विश्वविक्रम मोडले. यावरुन हा सामना कशा प्रकारचा होता याचा अंदाज बांधता येतो.
झिम्बाब्वेनं उभारला धावांचा डोंगर : वास्तविक, ICC पुरुष T20 विश्वचषक उप-प्रादेशिक आफ्रिका पात्रता गट बी सामन्यात झिम्बाब्वे आणि गांबिया आमनेसामने आले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 20 षटकांत 4 गडी गमावून 344 धावा केल्या. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आता झिम्बाब्वेच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या नावावर होता, त्यांनी गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्ध 3 विकेट गमावून 314 धावा केल्या होत्या.
जागतिक विक्रमांची मालिका : या सामन्यात झिम्बाब्वेनं केवळ चौकार आणि षटकारांच्या जोरावर 344 धावांपैकी 282 धावा केल्या आणि नवा विश्वविक्रम रचला. यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. भारतानं अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या T20 सामन्यात चौकार आणि षटकारांच्या जोरावर 232 धावा केल्या होत्या. या सामन्यात झिम्बाब्वेनं एकूण 57 चौकार आणि षटकार मारत आंतरराष्ट्रीय T20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याचा नवा विश्वविक्रम केला. त्यांनी भारतीय संघाचा 47 चौकार-षटकारांचा विक्रम मोडला. T20 डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही झिम्बाब्वेच्या नावावर आहे. झिम्बाब्वेनं या सामन्यात 27 षटकार मारत नेपाळचा 26 षटकारांचा विक्रम मोडला.
आंतरराष्ट्रीय T20 मधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या :
- 344/4 - झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया, नैरोबी, 2024
- 314/3 - नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, 2023, आशियाई खेळ
- 297/6 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 286/5 - झिम्बाब्वे विरुद्ध सेशेल्स, नैरोबी, 2024
- 278/3 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
रझा ठरला सिकंदर : झिम्बाब्वेला या धावसंख्येपर्यंत नेण्यात कर्णधार सिकंदर रझाचं सर्वात मोठं योगदान होतं. सिकंदर रझानं केवळ 33 चेंडूत शतक झळकावलं आणि ICC च्या पूर्णवेळ सदस्य देशांमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्यानं रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरचा रेकॉर्ड तोडला. सिकंदर रझानं 43 चेंडूत 15 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं नाबाद 133 धावांची खेळी केली. अशाप्रकारे सिकंदर रझा झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिलं शतक झळकावणारा फलंदाज ठरला.