मुंबई Anshuman Gaikwad : कॅन्सरशी झुंज देत असलेले माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं (बीसीसीआय) एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड हे ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत.
तात्काळ मदत जाहीर : बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेनं रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, 'जय शाह यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) भारताचे दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी तत्काळ प्रभावानं 1 कोटी रुपये जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत, जे कर्करोगाशी लढत आहेत.' तसंच जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना मदत केली. या संकटाच्या वेळी गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी बीसीसीआय उभं आहे आणि गायकवाड यांच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते ते करेल. गायकवाड यांच्या प्रकृतीवर बीसीसीआय लक्ष ठेवणार असून या आजारातून ते भक्कमपणे बाहेर पडतील असा त्यांना विश्वास आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
कसं होतं क्रिकेट करिअर : अंशुमन गायकवाड यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी कोलकाता इथं वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1984 च्या शेवटच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध सुरु झालेल्या कोलकाता कसोटी त्यांचा शेवटचा कसोटी सामना होता. त्यांनी 40 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 30.07 च्या सरासरीनं 1985 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 201 धावा होती, जी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध केली होती. तसंच गायकवाड यांनी भारतासाठी 15 एकदिवसीय सामन्यांमध्येही भाग घेतला आहे, ज्यात त्यांच्या नावावर 20.69 च्या सरासरीनं 269 धावा आहेत. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांनी 206 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 41.56 च्या सरासरीनं 12,136 धावा केल्या होत्या. यात त्यांनी 34 शतकं आणि 47 अर्धशतकं केली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधली त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 225 धावा होती. याशिवाय, त्यांनी 55 लिस्ट-ए सामने देखील खेळले, ज्यात त्यांनी 32.67 च्या सरासरीनं एकूण 1601 धावा केल्या.
वडीलही होते क्रिकेटपटू : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी कोचिंगची जबाबदारी घेतली. 1997-99 दरम्यान ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. गायकवाड यांनी गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (GSFC) मध्येही काम केलं आणि 2000 मध्ये या कंपनीतून निवृत्त झाले. जून 2018 मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. अंशुमन गायकवाड यांचे वडील दत्ता गायकवाड यांनीही कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
हेही वाचा :
- बीसीसीआयची मोठी घोषणा; भारतीय क्रिकेटमध्ये 'गंभीर'युग सुरू, प्रशिक्षकपदाचा कधीपासून घेणार पदभार? - Team India Head Coach