ढाका BAN vs SA 2nd Test Live Streaming : बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज म्हणजेच 29 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघानं दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय : पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेसमोर 106 धावांचं लक्ष्य होतं, जे पाहुण्या संघानं 22 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेसाठी टोनी डी झॉर्झीनं दुसऱ्या डावात 52 चेंडूत सर्वाधिक 41 धावा केल्या. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सनं 30 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आहे. या मालिकेत नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करमच्या हाती आहे.
बांगलादेश विजयाच्या प्रतिक्षेत : या मालिकेत बांगलादेशला आपल्या फिरकीपटूंच्या बळावर घरच्या मैदानावर मोठा विजय नोंदवायचा आहे, तर दक्षिण आफ्रिका आपल्या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आव्हान सादर करण्यास सज्ज आहे. अलीकडेच बांगलादेश संघाला भारताविरुद्धच्या मालिकेत 0-2 नं पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली संघ दुसऱ्या कसोटी विजयासाठी सज्ज झाला आहे. नजमुल हुसेन शांतो जबरदस्त फॉर्मात आहे. नजमुल हुसेन शांतोनं गेल्या 10 सामन्यांत 36 च्या सरासरीनं 682 धावा केल्या आहेत. दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेला नियमित कर्णधार टेंबा बावुमाच्या अनुपस्थितीत खेळावं लागणार आहे. एडन मार्करम संघाची धुरा सांभाळणार आहे. एडन मार्करमनं गेल्या काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. एडन मार्करमनं 6 सामन्यांत 46 च्या सरासरीनं 501 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका 2002 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 15 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 13 सामनं जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशच्या संघाला दक्षिण आफ्रिकेला एकदाही हरवता आलेलं नाही. दोन्ही संघांमध्ये बांगलादेशच्या भूमीवर 7 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेनं 5 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, 2 सामने अनिर्णित राहिले.
खेळपट्टी कशी असेल : प्राप्त वृत्तानुसार, चट्टोग्राममधील जहूर अहमद चौधरी स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळते. तथापि, पहिले एक ते दोन दिवस फलंदाजांसाठी चांगले मानले जातात आणि नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांनाही मदत करतात. जसजसा सामना पुढं जाईल तसतशी खेळपट्टी फलंदाजांसाठी काही अडचणी निर्माण करु शकते. पण खेळाच्या शेवटच्या दिवसांत खेळपट्टीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. जिथं फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नाणेफेक जिंकणारा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?