रावळपिंडी BAN vs NZ 6th Match Live : चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहावा सामना आज 24 फेब्रुवारी रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेश आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात खेळला जात आहे. ग्रुप अ मध्ये असलेल्या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा मानला जात आहे. जर न्यूझीलंडनं हा सामना जिंकला तर त्यांचं सेमीफायनलमधील स्थान पूर्णपणे निश्चित होईल आणि भारतीय संघही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
कीवींचा गोलंदाजीचा निर्णय : या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, न्यूझीलंड संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी 8 षटकात 45 धावा फलकावर लावल्या. मात्र 9व्या षटकात मायकेल ब्रेसवेलनं तन्जीद हसनला (24) बाद करत न्यूझीलंडला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर 12व्या षटकात विल्यम ओ'रोर्कनं मेहदी हसन मिराजला 13 धावांवर बाद केलं. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी नझमुल हुसेन शांतो आणि तौहीद हृदयॉय यांच्यात 33 धावांची भागीदारी झाली, मात्र यानंतर पुन्ही एकदा मायकेल ब्रेसवेलनं 21व्या षटकात तौहीद हृदयॉयला (7) बाद करत भागीदारी तोडली. त्यानं आपल्या पुढच्याच षटकात मुशफिकुर रहीमला बाद करत बांगलादेशला चौथा धक्का दिला. दरम्यान कर्णधार नझमुल हुसेन शांतोनं एका टोकानं संयमी फलंदाजी करत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. सध्या बांगलादेशच्या 170हून अधिक धावा झाल्या असून त्यांच्या सहा विकेट गेल्या आहेत.
दोन्ही संघांत कोणाचा वरचष्मा : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 45 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंडनं 33 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश संघाला फक्त 11 वेळा विजय मिळवता आला आहे, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्याच वेळी, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तटस्थ ठिकाणी 10 वनडे सामने खेळले गेले आहेत, ज्यात न्यूझीलंडनं 8 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश संघानं त्यांना दोनदा पराभूत करण्यात यश मिळवलं आहे. तसंच गेल्या 10 वनडे सामन्यांमध्ये न्यूझीलंडनं 9 वेळा बांगलादेशला हरवले आहे. याचा अर्थ असा की, कीवी संघानं बांगलादेशविरुद्ध नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे.