रावळपिंडी (पाकिस्तान) PAK vs BAN 1st Test :पाकिस्तान क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.यातील पहिल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. चौथ्या डावात पाकिस्ताननं दिलेलं 30 धावांचं लक्ष्य बांगलादेशनं एकही गडी न गमावता गाठत इतिहास रचला आहे. बांगलादेशचा पाकिस्तानवर हा पहिलाच कसोटी विजय आहे. (pakistan national cricket team)
पाकिस्तानवर पहिलाच कसोटी विजय : बांगलादेशचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. जिथं या दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिला सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी इथं झाला. ज्यात बांगलादेशनं बाजी मारली. कसोटी इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय आहे. बांगलादेशनं 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते पाकिस्तानविरुद्ध 15 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी प्रथमच विजय मिळवला आहे. याआधी 12 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. एक रद्द करण्यात आला. (pak vs ban test live)
खराब सुरुवातीनंतर उभारली मोठी धावसंख्या : सामन्यात खराब सुरुवातीनंतर पाकिस्तान संघानं सौद शकील आणि मोहम्मद रिझवानच्या शतकांच्या जोरावर पहिल्या डावात 6 विकेट गमावत 448 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येवर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं डाव घोषित केला. यात रिझवाननं 11 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 171 धावा केल्या. तर शकीलनं आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत 141 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूद आणि शरीफुल इस्लामनं प्रत्येकी 2 बळी घेतले.