नवी दिल्ली Babar Azam Dropped : पाकिस्तानचा मुलतानमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाला. यानंतर आता दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटीही मुलतानमध्ये आहे, मात्र यात बाबर आझम पाकिस्तानच्या संघात दिसला नाही तर आश्चर्य वाटू नये. कारण पाकिस्तानच्या नव्या निवड समितीनं बाबर आझमला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबरपासून मुलतान इथं सुरु होत आहे.
बाबर आझमची संघातील जागा धोक्यात : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी संघ निवडण्यापूर्वी पाकिस्तानच्या नव्या निवड समितीनं आतापर्यंत दोन बैठका घेतल्या आहेत. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर गेल्या शुक्रवारी लाहोरमध्ये पहिली बैठक झाली. दुसरी बैठक गेल्या शनिवारी मुलतानमध्ये झाली. मुलतान इथं झालेल्या बैठकीत नवीन निवड समितीच्या सर्व सदस्यांव्यतिरिक्त कसोटी संघाचा कर्णधार शान मसूद आणि मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी हे देखील उपस्थित होते. या बैठकीचा मुख्य मुद्दा बाबर आझम हा होता. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत अनेक सदस्य बाबर आझमच्या बाजूनं बोलताना दिसले. पण बहुतेक लोक त्याला दुसऱ्या कसोटीत न खेळवण्याबाबत बोलताना दिसले.
बाबरचा खराब फॉर्म सर्वांनाच अडचणीचा : खराब फॉर्ममुळं पाकिस्तानच्या कसोटी संघातील बाबर आझमचं स्थान अडचणीत आलं आहे. बाबरचा फॉर्म गेल्या दोन वर्षांपासून डळमळीत आहे. जर आपण फक्त 2023 सालापासून आतापर्यंत बोललो तर त्यानं 9 कसोटींमध्ये केवळ 21 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. शतक तर सोडा, बाबरनं डिसेंबर 2022 पासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. सध्याच्या मालिकेतही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बाबरला मुलतानच्या सपाट खेळपट्टीवर 2 डावात केवळ 35 धावा करता आल्या.
कायद-ए-आझम ट्रॉफीत बाबर खेळणार : आता प्रश्न असा आहे की बाबर आझम दुसऱ्या कसोटीत संघाचा भाग बनला नाही तर तो कायद-ए-आझम या देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसेल का? कायद-ए-आझम ट्रॉफी 20 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. बाबर आझमनं शेवटचं प्रथम श्रेणी क्रिकेट 2019 मध्ये खेळला होता. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 15 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यापूर्वी मुलतानमध्ये इंग्लंडनं पहिली कसोटी एक डाव आणि 47 धावांनी जिंकली होती, हा पाकिस्तानचा सलग सहावा कसोटी पराभव होता. कसोटी खेळपट्टीवरील पाकिस्तानच्या खराब स्थितीचा परिणाम त्याच्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवरही होत आहे.
हेही वाचा :
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक करत भारतीय संघ T20 विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणार? भारतात 'इथं' पाहा लाईव्ह सामना
- 22 षटकार, 26 चौकार... भारतीय संघाचं विक्रमी ऐतिहासिक 'सिमोल्लंघन'; आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 'असं' पहिल्यांदाच घडलं