सिडनी Australia Win BGT After 10 Years : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. यासह भारतीय संघानं ही मालिका 1-3 नं गमावली. भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात विजयानं केली होती. मात्र यानंतर भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही, त्यामुळं त्यांना मालिकेत पराभवाला सामोरं जावं लागलं आणि ऑस्ट्रेलियाची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली. या विजयासह ऑस्ट्रेलियानं WTC च्या अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं आहे.
एका दशकानंतर गमावला बॉर्डर-गावस्कर करंडक : हा पराभव भारतीय संघासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. वास्तविक, भारतीय संघानं 10 वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली आहे. याआधी टीम इंडियाला 2014-15 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभव पत्करावा लागला होता, तेव्हा ऑस्ट्रेलियानं 2-0 असा विजय मिळवला होता. यानंतर दोन्ही संघांमध्ये 4 मालिका खेळल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी भारतानं विजय मिळवला, त्यापैकी दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केलं. पण यावेळी भारतीय संघाला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही, त्यामुळं ऑस्ट्रेलियानं दशकभरानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली.
सिडनी कसोटीत भारतीय फलंदाजी फ्लॉप :सिडनी कसोटीत भारताची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती होती. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची फलंदाजी पुन्हा एकदा खराब झाली. टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 185 धावा करता आल्या. या डावात ऋषभ पंतनं सर्वाधिक 40 धावा केल्या, त्याच्याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कही 3 बळी घेण्यात यशस्वी ठरला.
भारताला पहिल्या डावात आघाडी :प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा पहिला डावही काही खास नव्हता, ते केवळ 181 धावांवर गडगडले. प्रसीद कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी 3-3 विकेट घेत संघात पुनरागमन केलं आणि जसप्रीत बुमराह-नितीश रेड्डी यांनाही 2-2 बळी मिळाले. दुसरीकडे, ब्यू वेबस्टरनं या डावात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 57 धावा केल्या, हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळं संघाला 4 धावांची आघाडी मिळाली. पण दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. यावेळीही फक्त ऋषभ पंतची बॅट कामी आली. ऋषभ पंतनं 33 चेंडूत 61 धावांची जलद खेळी खेळली, पण यानंतरही भारतीय संघ अवघ्या 157 धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठण्यात ऑस्ट्रेलियाला कोणतीही अडचण आली नाही आणि त्यांनी सहज विजय मिळवला.
हेही वाचा :
- 29 चेंडूत मोडला 50 वर्षे जुना विक्रम... SCG वर ऋषभ पंतची तुफानी खेळी
- 4,4,4,4... जैस्वालची 'यशस्वी' खेळी, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच मोठा रेकॉर्ड