पर्थ AUS vs IND 1st Test Live Streaming : ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर मालिका 22 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरु होत आहे. या मालिकेत 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट संघानं 2017 पासून बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवला आहे. ही परंपरा त्यांना पुढं चालू ठेवायची आहे. यासह भारताला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही आपलं स्थान निश्चित करायचं आहे. मागच्या वेळी भारतानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना गाबा इथं शानदार विजय मिळवला होता. ऋषभ पंत भारताचा स्टार फलंदाज म्हणून उदयास आला होता.
दोन्ही संघासाठी मालिका महत्त्वाची : ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघाला तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 4-0 नं पराभूत करावं लागेल, जे इतकं सोपं नसेल. मात्र, भारताला बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकण्याची आशा असेल, तर भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या वेळी भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना गाब्बामध्ये शानदार विजय मिळवला होता. तेव्हा ऋषभ पंत भारताचा स्टार फलंदाज म्हणून उदयास आला होता. मात्र या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसल्यानं संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारताचं नेतृत्त्व करणार आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संघ आतापर्यंत एकूण 107 वेळा कसोटीत आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं 107 पैकी 45 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघानं 32 सामने जिंकले आहेत. याशिवाय 29 सामने अनिर्णित राहिले आहेत. हेड टू हेड रेकॉर्डवरुन स्पष्ट होतं की ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत आहे. विशेषत: कांगारु संघाचा घरच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं भारतीय संघासाठी इतकं सोपं नसेल.
ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांमध्ये भारताची कामगिरी कशी?
भारतीय संघानं 1947/48 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. जेव्हा दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी खेळली गेली आणि ऑस्ट्रेलियानं ती मालिका 4-1 नं जिंकली होती. त्यानंतर 1996 मध्ये, दोन्ही क्रिकेट मंडळांनी महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु केली. ज्यात भारतानं पहिल्या दोन मालिका जिंकल्या होत्या. तथापि, 1999/2000 मध्ये जेव्हा भारतानं ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच अधिकृतपणे मायदेशात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर जवळपास दशकभर ऑस्ट्रेलियानं घरच्या मैदानावर भारतावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं, पण भारतानं पलटवार करत ऑस्ट्रेलियात सलग दोन मालिका जिंकल्या आहेत.
पर्थमधील चारही कसोटी ऑस्ट्रेलियानं जिंकल्या : ऑस्ट्रेलियन संघ पर्थ स्टेडियमवर आतापर्यंत अपराजित आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियानं 4 कसोटी सामने खेळले आहेत. यात ऑस्ट्रेलियानं हे सर्व जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियानं या मैदानावर केलेली सर्वोच्च धावसंख्या 598/4 (डाव घोषित) आहे, जी 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवली गेली होती. या मैदानावर मार्नस लॅबुशेननं (204 धावा) सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली आहे. इथं मिचेल स्टार्कनं (9/97) एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघानं पर्थमध्ये खेळली एकमेव कसोटी : भारतीय संघानं 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये एकमेव कसोटी खेळली होती. ऑस्ट्रेलियानं हा सामना 146 धावांनी जिंकला होता. या मैदानावर भारतीय संघानं सर्वाधिक 283 धावा केल्या आहेत. या खेळपट्टीवर विराट कोहलीनं (123 धावा) भारतीय संघासाठी सर्वोच्च वैयक्तिक खेळी खेळली आहे. या मैदानावर 5 बळी घेणारा मोहम्मद शमी हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्या सामन्यात मोहम्मद शमीनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 56 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या.