मेलबर्न Pat Cummins on Break : पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. ज्यानं 2023 मध्ये भारताकडून दोन आयसीसी ट्रॉफी हिसकावून घेतल्या. मात्र आता पुन्हा एकदा महामुकाबला जवळ आल्यावर पॅट कमिन्सनं क्रिकेटपासून दूर राहण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकलं होतं.
पॅट कमिन्सनं हा घेतला निर्णय :गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपासून पॅट कमिन्स खूप व्यस्त वेळापत्रकातून गेला आहे. एकदिवसीय विश्वचषक, आयपीएल 2024, टी 20 विश्वचषक यासह कोणतीही स्पर्धा त्यानं गमावली नाही. आता थकवा आणि कामाच्या ताणामुळं पॅट कमिन्सनं सुमारे 8 आठवड्यांचा ब्रेक घेतला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपर्यंत फ्रेश होण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्स भारत-ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यासाठी आतुर आहे. 2014-15 पासून ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध मायदेशात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. 2018-19 आणि 2020-21 मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करुन इतिहास रचला होता. मात्र यावेळी पॅट कमिन्स पूर्ण तयारीनिशी सामन्यांसाठी सज्ज होत आहे. 22 नोव्हेंबरपासून उभय संघांमधील कसोटी मालिका सुरु होणार असून, ही कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.