ब्रिस्बेन AUS vs WI Test Match : ब्रिस्बेन येथील दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. अत्यंत रोमांचक झालेल्या या कसोटीत कॅरेबियन संघानं 8 धावांनी विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचं लक्ष्य होतं, पण कांगारुंचा संघ केवळ 207 धावांवरच मर्यादित राहिला. स्टीव्ह स्मिथनं ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत कसोटी जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वेस्ट इंडिजनं अखेरचा कसोटी सामना 1997 मध्ये जिंकला होता. या विजयानं 27 वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळही संपला. तसंच ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दिवसरात्र कसोटीत पराभूत झालाय.
स्टीव्ह स्मिथची शानदार खेळी तरी कांगारुंचा पराभव : या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 216 धावांचं लक्ष्य होतं. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. मात्र, स्टीव्ह स्मिथनं एक टोक सांभाळत 146 चेंडूत 91 धावा करून नाबाद राहिला. मात्र त्याल ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळता आला नाही. स्मिथ व्यतिरिक्त कांगारुंकडून अष्टपैलू कॅमेरुन ग्रीननं 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळं ऑस्ट्रेलियन संघ विजयापासून फक्त 8 धावांनी दूर राहिला.
शेमार जोसेफसमोर कांगारु फलंदाजांची शरणागती : वेस्ट इंडिजसाठी शेमार जोसेफ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शेमार जोसेफनं 7 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना माघारी धाडलं. याशिवाय अल्झारी जोसेफलाही 2 बळी मिळाले. तर जस्टिन ग्रेव्हरनं 1 बळी घेतला. शेमार जोसेफ आपल्या दमदार कामगिरीमुळं सामनावीर तसंच मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कॅरेबियन संघाचा पलटवार :पहिल्या डावात वेस्ट इंडिजनं 311 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघानं 289 धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिजला 22 धावांची आघाडी मिळाली. यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 193 धावांवर आटोपला. याप्रकारे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत कॅरेबियन संघाचा पराभव केला होता, पण ब्रिस्बेन कसोटीत वेस्ट इंडिजनं रोमहर्षक विजयाची नोंद करत जोरदार पलटवार केलाय.
हेही वाचा :
- पहिली कसोटी: ओली पोपचा भारतीय गोलंदाजांना 'चोप'; विक्रमी खेळी करत भारताला दिलं 231 धावांचं लक्ष्य
- इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटूनं उद्धवस्त केलं भारतीय संघाचं 'रुट'; भारताकडं भक्कम आघाडी, दुसऱ्या डावात साहेबांना पहिला धक्का
- काय सांगता! 147 चेंडूत 300 धावा; हैदराबादच्या तन्मयनं रचला इतिहास, ब्रायन लाराचा 'हा' विक्रमही धोक्यात