भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या भारतात सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी आयोजित केली जात आहे. ज्यात अनेक मोठे रेकॉर्ड बनवले जात आहेत. दरम्यान, एका स्टार युवा खेळाडूनं सामन्यादरम्यान एकाच डावात सर्व 10 विकेट घेतल्या आहेत. हा खेळाडू दुसरा कोणी नसून अंशुल कंबोज आहे. हरियाणाकडून खेळताना अंशुल कंबोजनं इतिहास रचला आहे. भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात सहावी वेळ आहे, जेव्हा एकाच गोलंदाजांं 10 विकेट घेतल्या.
लाहली इथं सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात केरळविरुद्ध एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज नाही. त्याच्या आधी आणखी दोन गोलंदाजांनीही अशी कामगिरी केली आहे. अनिल कुंबळेनंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या वतीनं ही कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात त्यानं सर्व 10 विकेट घेतल्या होत्या.
38 वर्षांनंतर घडलं :
शेवटच्या वेळी रणजी ट्रॉफीमध्ये एकाच डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम 1985-86 हंगामात झाला होता. 1956-57 च्या हंगामात हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. प्रेमांगसू मोहन चटर्जी आणि प्रदीप सुंदरम यांनी रणजीमध्ये अशी कामगिरी केली आहे. प्रेमांगसू मोहन चॅटर्जी यांनी 1956-57 मध्ये आणि प्रदीप सुंदरम यांनी 1985-86 मध्ये असं केलं होतं. बंगाल संघाकडून खेळताना चॅटर्जीनं पहिल्यांदा ही कामगिरी केली होती. याशिवाय प्रदीप सुंदरमनं 38 वर्षांपूर्वी राजस्थानसाठी ही कामगिरी केली होती.
कंबोजचा खास चमत्कार :
अंशुल कंबोजबद्दल सांगायचं तर कंबोजनं हरियाणासाठी इतिहास रचला आहे. शॉन रॉजर हा त्याचा या डावातील 10वा बळी ठरला. कपिल हुडाने त्याला उत्कृष्ट झेल घेत ही विकेट पूर्ण करण्यात मदत केली. गोलंदाजांचं असं वर्चस्व रणजीमध्ये क्वचितच पाहायला मिळतं. आधुनिक क्रिकेटमधील गोलंदाजासाठी अशी कामगिरी निश्चितच खूप खास आहे. यासह कंबोजनं 19 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत. तो नुकताच ओमान येथे झालेल्या एसीसी इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारत अ संघाकडून खेळला होता. कंबोजचा यंदाचा लाल चेंडूचा हंगाम चांगला आहे. त्यानं केरळविरुद्ध 30.1 षटकात फक्त 49 धावा दिल्या.
हेही वाचा :
- 727/2... गोव्याच्या फलंदाजांनी उभारला धावांचा हिमालय; भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं
- 'गब्बर' इज बॅक... शिखर धवन 'या' देशातील संघाकडून खेळणार क्रिकेट, निवृत्तीनंतर घेतला मोठा निर्णय