अमरावती Amravati Olympic Team :खेळाचा महाकुंभ असणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकला आजपासून सुरुवात झाली आहे. 1936 च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चमूला भारतीय व्यायाम पद्धतीचा प्रसार आणि प्रचार करण्याची संधी मिळाली. त्याच्या स्मृती आता 88 वर्षानंतर ताज्या झाल्या आहेत. या चमुतील अनेक सदस्यांची कामगिरी पाहता जर्मनीचे तत्कालीन चान्सलर ॲडॉल्फ हिटलर यांनी अनेकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देखील मारली. ऑलिंपिकच्या 'हिटलर युगात' अमरावतीला मिळालेल्या या विशेष मानासंदर्भात' ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
बर्लिन ऑलिंपिकमध्ये अमरावतीला कशी मिळाली संधी ? :अमरावती शहरात इ. स. 1914 मध्ये अंबादासपंत वैद्य आणि अनंत वैद्य या वैद्य बंधूंनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. अनेक मल्ल आणि विविध क्षेत्रातील खेळाडूंना घडवणाऱ्या या मंडळाची ख्याती सुरुवातीच्या काळापासूनच जगभर पसरली. अंबादासपंत वैद्य यांनी जगातल्या व्यायाम पद्धतीचा अभ्यास करण्याच्या उद्देशानं व्यायाम शाळेतील कार्यकर्ते एल जे कोकर्डेकर यांना 1928 मध्ये जर्मनीला पाठवलं. जर्मनीमध्ये डॉ. कॅरी डीम यांच्या मार्गदर्शनात एल जे कोकर्डेकर यांनी पूर्व आणि पाश्चात्य खेळामध्ये संशोधन करुन आचार्य पदवी मिळवली. डॉ. कोकर्डेकर हे पुढं भारतात आल्यावर ते नागपूर विद्यापीठात शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून रुजू झालेत. दरम्यान 1936 मध्ये बर्लिन ऑलिंपिकची घोषणा झाली. बर्लिन ऑलिंपिकमध्ये भारतीय व्यायाम पद्धतीचा प्रसार आणि प्रचाराची संधी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला मिळावी, यासाठी अंबादासपंत वैद्य यांच्या सांगण्यावरुन कोकर्डेकर यांनी बर्लिन ऑलिंपिकचे सचिव डॉ. कॅरी डीम यांच्याशी पत्रव्यवहार केला. डॉ कॅरी डीम यांनी अमरावतीच्या "श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चमूला बर्लिन ऑलिंपिकसाठी पाठवण्यात यावं," असं पत्र भारतीय ऑलम्पिक संघटनेला दिलं. त्यामुळेच एकूण 25 जणांचा संघ बर्लिन ऑलिंपिकमध्ये जाण्याच्या तयारीला लागला.
स्वखर्चानं बर्लिन वारीची अट : "श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चमूला बर्लिन ऑलिंपिकमध्ये येण्याचं निमंत्रण जर्मन हुकूमशहा हिटलर यांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालं. बर्लिन जाण्यासाठी मात्र या चमुला स्वखर्चानं जावं लागणार होतं. त्यावेळी बडोद्याचे तत्कालीन महाराज सयाजी राजे गायकवाड यांनी आर्थिक मदत दिली. यामुळेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची चमू बर्लिन वारीसाठी सज्ज झाली," अशी माहिती मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके यांनी दिली.
चमूत यांचा होता समावेश :बर्लिन ऑलिंपिकसाठी निश्चित चमूमध्ये प्रमुख संघटक म्हणून डॉ एल जे कोकर्डेकर, संघाचे अध्यक्ष म्हणून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पटवर्धन, यवतमाळचे डॉ. सिद्धनाथ काणे, संघाचे उपसंघटक हरी अनंत असनारे, रघुनाथ खानिवाले, सूरतचे हरीसिंह ठाकुर, रामेश्वर अग्रवाल, भरत देशपांडे, एस बी माजलगावकर, मुंबईचे नगीनदास मेहता, डी एन लाड, जी जी राजदेरकर, प्रेमजी राजोदा, पनवेलचे डी एम खडके जोशी, एस बी खेर, जळगावचे डी एस सहजे, चिनूभाई शहा, यवतमाळचे टी एम देशमुख, अमरावतीचे लक्ष्मण करमकर, जी डब्ल्यू जमखंडीकर, जी एल नर्डेकर, व्ही बी कप्तान, एस जी चिखलीकर, वर्धा येथील कमलनयन बजाज आणि एल एम जोशी अशा 27 जणांचा समावेश होता. मात्र ऐनवेळी नागपूर विद्यापीठानं परवानगी नाकारल्यामुळे डॉ. कोकर्डेकर आणि पासपोर्ट मिळाला नसल्यामुळे डॉ. शिवाजीराव पटवर्धन या दोघांना वगळून इतर 25 जण बर्लिनला निघाले.