नवी दिल्ली Team India Cricketers : भारताचा स्टार फलंदाज शिखर धवननं 24 ऑगस्ट (शनिवार) रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धवननं एका व्हिडिओ पोस्टद्वारे ही माहिती दिली. धवननं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचं प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट होतं. 38 वर्षीय धवन 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे.
आणखी खेळाडू निवृत्ती घेण्याची शक्यता : धवनच्या निवृत्तीनंतर आगामी काळात आणखी काही भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. या खेळाडूंना बऱ्याच काळापासून संधी मिळाली नाही आणि भविष्यातही असं होण्याची शक्यता नाही. तरुण खेळाडूंकडे लक्ष दिल्यानं अशा खेळाडूंना राष्ट्रीय संघात पुनरागमन करणं फार कठीण आहे. या यादीत 2011 च्या क्रिकेट विश्वचषकात सहभागी झालेल्या विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश आहे.
ऋद्धिमान साहा : महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऋद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून खूप संधी मिळाल्या. मात्र, नंतर साहाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. वृध्दिमान साहानं शेवटचा सामना 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळलेला वृद्धिमान साहा 39 वर्षांचा आहे. केएस भरत, इशान किशन, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांच्यामुळं साहाच्या संघात पुनरागमनाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत.
इशांत शर्मा :वेगवान गोलंदाज इशांत शर्मा एकेकाळी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. पण आता त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे. इशांत शर्मानं भारतासाठी 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी 20 सामने खेळले आहेत. इशांतनं कसोटीत 311, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 115 आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. त्यानं नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 35 वर्षीय इशांत शर्माचं पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे, कारण भारतीय संघ आता युवा वेगवान गोलंदाजांना संधी देत आहे.
मनीष पांडे : मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेची कथाही करुण नायरसारखीच आहे. 34 वर्षीय मनीष पांडेला मिळालेल्या सर्व संधींचा फायदा घेता आला नाही. पांडेनं भारतासाठी 29 कसोटी आणि 39 टी 20 सामने खेळले. या काळात त्यानं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 566 धावा आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 709 धावा केल्या. पांडेनं जुलै 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
पियुष चावला :35 वर्षांचा पियुष चावला क्रिकेट विश्वचषक 2011 मध्ये भारतीय संघाचा सदस्य होता. पीयूष शेवटचा डिसेंबर 2012 मध्ये भारताकडून खेळताना दिसला नाही. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज पियुषनं भारतासाठी तीन कसोटी, 25 एकदिवसीय आणि 7 टी 20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर सात कसोटी, 32 एकदिवसीय आणि 4 टी 20 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. पियुषनं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) चं प्रतिनिधित्व केलं.
अमित मिश्रा : उजव्या हाताचा लेगब्रेक गोलंदाज अमित मिश्रा यानंही अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. अमितनं शेवटचं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व 2017 मध्ये केलं होतं. जेव्हा तो इंग्लंडविरुद्धच्या टी 20 सामन्यात दिसला होता. 41 वर्षीय अमितनं भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्यानं 156 विकेट घेतल्या आहेत. अमित आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळला.