नवी दिल्ली Rashid Khan : अफगाणिस्तानच्या टी 20 क्रिकेटचा संघाचा कर्णधार राशिद खाननं ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगच्या आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रशीद या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. या स्पर्धेच्या प्लेअर ड्राफ्टमध्ये राशिदचं नाव नाही. बिग बॅशच्या नवीन हंगामाचा प्लेअर ड्राफ्ट 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
काय आहे कारण :आयसीसीच्या फ्युचर टूर प्रोग्राम अंतर्गत या महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका प्रस्तावित करण्यात आली होती. अफगाणिस्तान या मालिकेचं यजमानपद भूषवणार होता, मात्र ऑस्ट्रेलियानं तालिबानचं कारण सांगत माघार घेतली होती. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीत महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलं होतं. यामुळं त्यांचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) सोबत या विषयावर नियमित चर्चा झाली आहे आणि आशा आहे की भविष्यात दोन्ही संघ एकमेकांशी खेळण्यास सुरुवात करतील, असं क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) चे मुख्य कार्यकारी निक हॉकले यांनी म्हटलं होतं.
तीन वेळा मालिका खेळण्यास नकार : ऑस्ट्रेलियन संघानं तालिबानच्या राजवटीत मुली आणि महिलांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं कारण देत तीन वेळा अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. पण आयसीसी स्पर्धेत ते एकेमांविरोधात खेळत आहेत. राशिद खाननं यापूर्वीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर टीका केली आहे. टी 20 विश्वचषकात अफगाणिस्तानच्या ऑस्ट्रेलियावर प्रसिद्ध विजयानंतर उस्मान ख्वाजानंही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
अनेक लीगमध्ये घेतो भाग : राशिद खाननं अलीकडेच इंग्लंडमध्ये झालेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्सचं प्रतिनिधित्व केलं. राशीद हा एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असून तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे. राशिद खाननं बिग बॅशमध्ये ॲडलेड स्ट्रायकर्सकडून आतापर्यंत 69 सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 98 विकेट्स आहेत.
हेही वाचा :
- मोहम्मद शमी भारतीय संघात कधी परतणार? जय शाहांनी दिली मोठी अपडेट - mohammed shami
- 'एमएस धोनी माझा मित्र नाही...'; माहीबद्दल हे काय बोलून गेला खलील अहमद - Khaleel Ahmed
- 5 भाऊ-बहिणीच्या जोड्यांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; दोन तर अजूनही खेळत आहेत... - Raksha Bandhan