अबूधाबी Abu Dhabi T10 League Live Streaming : क्रिकेटचा सर्वात लहान फॉरमॅट अबूधाबी T10 लीगमध्ये दिसेल, जिथं प्रत्येक संघाला फक्त 10 षटकं खेळण्याची संधी मिळेल. या वर्षी एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, ज्यात चेन्नई ब्रेव्ह जग्वार्स, बांगला टायगर्स, डेक्कन ग्लॅडिएटर्स, मॉरिसविले सॅम्प आर्मी, न्यूयॉर्क स्ट्रायकर्स, नॉर्दर्न वॉरियर्स, टीम अबूधाबी, अजमान बोल्ट्स, यूपी नवाब आणि बांगला टायगर्स यांचा समावेश आहे. अबूधाबी T10 लीगची ही आवृत्ती क्रीडाप्रेमींसाठी खूप खास असेल, कारण हा क्रिकेटचा सर्वात वेगवान आणि रोमांचक स्वरुप आहे. खेळाडूंची आक्रमक फलंदाजी, भक्कम गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यामुळं ही स्पर्धा नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवून जाते. या स्पर्धेचा पहिला सामना आज सायंकाळी 5 वाजता होईल तर दुसरा सामना लगेच सायंकाळी 07:15 ला होईल. हे सर्व सामने अबूधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर खेळवले जातील.
स्पर्धेचं वैशिष्ट्य काय : अबूधाबी T10 लीग आजपासून म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी सुरु होत आहे. या स्पर्धेचा हा आठवा हंगाम आहे. या लीगचा अंतिम सामना 2 डिसेंबर 2024 रोजी खेळवला जाईल. अबू धाबी T10 लीग हा 11 दिवसांचा क्रिकेट कार्यक्रम असेल, ज्यात अनेक रोमांचक सामने पाहण्याची अपेक्षा आहे. यंदा या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या दहा संघांचे कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांची नावं आता समोर आली आहेत. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन बांगला टायगर्ससाठी दोन वर्षांपूर्वी अशीच भूमिका बजावल्यानंतर पुन्हा एकदा बांगला टायगर्सचे नेतृत्व करण्यास तयार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार युनूस खान सलग तिसऱ्या वर्षी टायगर्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ कायम ठेवणार आहे.
दिग्गज भारतीय बांगला टायगर्स संघाकडून खेळणार :अबुधाबी T10 लीगमध्ये एकूण 10 संघ आहेत. अशा परिस्थितीत आता क्रिकेटचे कोणते मोठे स्टार्स कोणत्या संघाकडून खेळताना दिसणार हा प्रश्न आहे. इंग्लंडचा जॉस बटलर आणि ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस हे डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचा भाग असतील. भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक देखील अबुधाबी T10 लीगमध्ये बांगला टायगर्सकडून खेळताना दिसणार आहे. राशिद खान देखील या संघाचा एक भाग असेल.