महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयसीसीला 5 वेळा बदलावं विश्वचषकाचं ठिकाण; पाकिस्तानकडूनही हिसकावलं होतं यजमानपद - ICC World Cup - ICC WORLD CUP

ICC World Cup : बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारामुळं महिला टी 20 क्रिकेट विश्वचषक 2024 चं ठिकाण बदलण्यात आलं आहे. याआधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती, मात्र तेथील बिघडलेल्या परिस्थितीमुळं ती आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ICC World Cup
महिला टी 20 क्रिकेट विश्वचषक (Getty Images)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 22, 2024, 7:50 PM IST

मुंबई ICC World Cup : बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारामुळं आयसीसी महिला टी 20 क्रिकेट विश्वचषक 2024 चं ठिकाण बदलण्यात आलं आहे. याआधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती, मात्र तेथील बिघडलेल्या परिस्थितीमुळं ती आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. परंतु, देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता आयसीसीला हा कठीण निर्णय घ्यावा लागला. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे अधिकार कायम ठेवणार असला तरी ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे.

भारतानं नाकारलं यजमानपद : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) हवामानाच्या चिंतेमुळं आणि एका वर्षात दोन विश्वचषक आयोजित केल्यामुळं स्पर्धेचं आयोजन करण्यास नकार दिला होता. परिणामी आयसीसीकडं बांगलादेशशिवाय मर्यादित पर्याय होते. यात यूएईची निवड करण्यात आली. कारण तिथं क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा आधीच अस्तित्वात आहेत आणि येथील हवामान देखील क्रिकेट खेळण्यासाठी अनुकूल आहे.

मागील 13 वर्षांत पाचव्यांदा घडलं : आयसीसी विश्वचषकाचं ठिकाण बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयसीएसनं जागा बदलली आहे. विविध कारणांमुळं त्यांना त्यात बदल करावे लागले. 2011 पासून 13 वर्षात आयसीसीला विश्वचषकाचं ठिकाण बदलावं लागण्याची ही पाचवी वेळ आहे.

2011 एकदिवसीय विश्वचषक : 2011 मध्ये पुरुष विश्वचषकाचं भारतासोबत पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशला यजमानपद मिळालं. ही स्पर्धा संयुक्तपणे आयोजित केली जाणार होती. 2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर बीसीसीआयनं आयसीसीशी आयोजनाबाबत चर्चा केली. पाकिस्तानला यजमानपदावरुन दूर करण्याबाबत त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. त्यानंतर आयसीसीनं पाकिस्तानकडून यजमानपद हिसकावून घेतलं आणि उर्वरित तीन देशांमध्ये सामन्यांचं आयोजन केलं.

2021 टी 20 विश्वचषक : 2021 चा टी 20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार होता. परंतु कोविड 19 महामारीनं आयसीसी कॅलेंडर विस्कळीत केलं. आयसीसीनं 2021 ची स्पर्धा पुढं ढकलली. त्यामुळं भारताला यजमानपदाचे अधिकार मिळाले आणि 2022 चा टी 20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाला मिळाला. मात्र, त्यानंतरही बरेच बदल झाले. कोविड महामारीच्या तिसऱ्या लोटेमुळं, भारतातही मैदानांवर सामना होऊ शकला नाही. परिणामी हे सामने यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केले. यावेळी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी 20 विश्वचषक जिंकला.

19 वर्षांखालील विश्वचषकांचीही ठिकाणं बदलली : बांगलादेशला महिला अंडर 19 टी 20 विश्वचषक 2021 चं यजमानपद मिळालं होतं. मात्र कोविड 19 महामारीमुळं 2023 मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं यजमानपद भूषवलं आणि भारत विजेता झाला. याशिवाय 2024 मध्ये पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषकाचं यजमानपद श्रीलंकेला मिळणार होतं. परंतु, 2023 मध्ये श्रीलंकेचं क्रिकेट स्थगित करण्यात आलं. त्यामुळं या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण आफ्रिकेला मिळालं.

हेही वाचा :

  1. भारतीय संघात वडिलांची कारकीर्द 13 दिवसांत संपली, नंतर सोडला देश; आता मुलगा इंग्लंडकडून मैदानात - Harry Singh
  2. शतक झळकावूनही एवढी मोठी शिक्षा... इंग्लंडच्या काउंटी संघानं अनुभवी भारतीय खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता - England Cricket

ABOUT THE AUTHOR

...view details