मुंबई Rohit Sharma IND vs AUS Series : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतील पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. रोहितनं वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयला ही माहिती दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
न्यूझीलंडविरुद्ध खेळणार तीन कसोटी सामने : बांगलादेशला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार आहे. 16 ऑक्टोबरपासून ही कसोटी मालिका सुरु होणार असून यामध्ये 3 सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका फक्त भारतातच खेळली जाणार आहे आणि प्रत्येकजण त्याची वाट पाहत आहे. पण सर्वात उत्सुकता आहे ती बॉर्डर-गावस्कर स्पर्धेची, जिथं भारतानं मागील सलग दोन ऑस्ट्रेलियन दौऱ्यांवर मालिका जिंकली आहे. यावेळी मालिकेत 4 ऐवजी 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत, परंतु यापैकी एका सामन्यात भारतीय संघाला कर्णधाराशिवाय खेळावं लागू शकतं.
अहवालात दावा काय : भारतीय कर्णधाराने याबाबत बीसीसीआयला माहिती दिल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये तर दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडीलेडमध्ये सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत अहवालात म्हटलं आहे की, सध्या याबाबतची परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नाही. सूत्रानं सांगितलं की, भारतीय कर्णधारानं आपल्या परिस्थितीबद्दल बोर्डाला माहिती दिली आहे आणि म्हटलं की तातडीच्या वैयक्तिक कारणांमुळं त्याला एका कसोटीतून बाहेर राहावं लागेल. मात्र, हे वैयक्तिक प्रकरण कसोटी मालिकेपूर्वी सुटल्यास तो पाचही कसोटी सामने खेळू शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. याबाबतची परिस्थिती येत्या काही दिवसांत मंडळाला स्पष्ट होईल, असंही सूत्रानं सांगितलं. आता यादरम्यान कर्णधार कोण होणार हा प्रश्न आहे.