हैदराबाद: हिंदू धर्मात मौनी अमावस्येला (Mauni Amavasya) अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2025 या वर्षातील पहिली अमावस्या कधी आहे, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्या तिथीला (Amavasya 2025) पितरांची पूजा केली जाते. असं केल्यानं सुख-समृद्धीत वाढ होते अशी मान्यता आहे. यंदा अमावस्या तिथी 28 का 29 जानेवारीला नेमकी कधी आहे ते जाणून घ्या.
मौनी अमावस्या 2025 शुभ मुहूर्त :पंचांगानुसार मौनी अमावस्या जानेवारीच्या 28 तारखेला संध्याकाळी 7.35 मिनीटांनी सुरू होणार आहे. तर समाप्त 29 तारखेला संध्याकाळी 6.05 वाजता होणार आहे. तर स्नान करण्याचा ब्रम्ह मुहूर्त हा 5.00 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल आणि 6.18 वाजता संध्याकाळी समाप्त होईल. यादिवशी गंगा नदीत स्नान करण्याबरोबरच दान करणं ही शुभ मानलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं.
मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे? : मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावं आणि शक्य नसल्यास घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं. स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावं. त्यानंतर पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे विधी करावेत. अमावस्येच्या दिवशी सात्विक भोजन करावं. अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, तुळशी वनस्पती आणि गंगा मातेची पूजा करावी. तसंच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्न, उबदार कपडे आणि पैसे दान करू शकता.